तिवरे धरण दुर्घटना : शिवसेना आमदाराच्या कंपनीवर गुन्हा दाखल करा – विजय वडेट्टीवार

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारच्या निष्क्रियतेचे बळी आहेत, असा संताप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या शिवसेनेचे स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीवर 302 कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयात विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. या दुर्घटनेतील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करून ते म्हणाले, हे धरण बांधून फक्त 19 वर्षे झाली. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे 100 वर्षे असताना अवघ्या 19 वर्षांतच धरण फुटते कसे? असा प्रश्न उपस्थित करुन या धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे.
या धरणाचे काम स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने केले आहे. त्यामुळे दुर्घटनेला ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करुन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तिवरे धरण फुटल्याने 13 घरे वाहून गेली आहेत तर आतापर्यंत 11 मृतदेह मिळाले असून अजून 18 जण बेपत्ता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे उपस्थित होते.

राज्यातील धरणांचे स्ट्रकचरल ऑडीट करा!
तिवरे धरणाला गळती लागली असल्याची तक्रार स्थानिक लोकांनी जलसंपदा खात्याकडे केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्याची डागडुजी केली असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे. डागडुजी करूनही धरण फुटलेच कसे, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ही दुर्घटना पाहता सरकारने राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करावे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)