न्यूट्रॉन बॉम्ब बनविण्यास मंजुरी
वॉशिंग्टन – अमेरिकन सिनेटने अध्यक्ष कार्टर यांना न्यूट्रॉन बॉम्बची निर्मिती करण्याबाबत हिरवे निशाण दाखविले आहे. मात्र अमेरिकन कॉंग्रेसकडे तशी परवानगी नाकारण्याचा हक्क कायम ठेवला आहे. अर्थात या प्रकरणी सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन कॉंग्रेसने नकार द्यावा, असे सिनेटने म्हटले आहे. अर्थात सिनेटचा हा निर्णय दिवसभर कडाक्याची चर्चा करून मगच घेण्यात आला. या न्यूट्रॉन बॉम्बने माणसे मरतात, पण इमारतीला वा इतर मालमत्तेला धक्का पोचत नाही. इतर नेहमीच्या बॉम्ब स्फोटाने मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणावर होते. अशी पुष्टी जोडण्यात आली.
भारत-कॅनडा करार झाला नाही
नवी दिल्ली – अणुशक्तीची निर्मिती व उपयोग या कामी भारत व कॅनडा यांचा कोणताही करार अद्याप झालेला नाही, असे उत्तर आज पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिले. मात्र त्याबाबत बोलणी झाल्याचे त्यांनी मान्य केले.
गोव्यास उच्च न्यायालय असावे
पणजी – गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय असावे, अशी मागणी होत आहे. मडगाव व पणजी येथे दोन वेगळी जिल्हा व सत्र न्यायालये स्थापन करण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात येत आहे. सध्या बॉम्बे उच्च न्यायालयामार्फत काम चालविले जाते.