प्रचारामुळे मिळणार “रोज’!

वर्तमान : रोहन मुजूमदार

कसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. युती-महाआघाडीचे काही उमेदवार घोषित झाले असून अन्य पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यात सुरुवात केली आहे. तर अपक्ष अद्याप गुलदस्त्यात असून तेही लवकरच घोषित होतील अशी अशा आहे. मात्र, जे उमेदवार घोषित झाले आहेत त्यांनी आपल्या प्रचाराचा “श्री गणेशा’ केला असून त्यांनी गावभेटी, प्रचाराची “राळ’ उठवण्यास सुरुवात केली आहे. या प्रचारामुळे कामगार, बेरोजगार, महिलांना प्रचाराचे काम मिळणार असून त्यांना “रोज’ मिळत असल्याने त्यांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. तसेच लोक कलावंत, गायक, वादक आणि ध्वनीमुद्रकांना रोजगार मिळणार असल्याने ते ही सज्ज झाले आहेत.

पूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले की सायकल रिक्षातून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून फिरता प्रचार करीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. यासोबत प्रचारातून लोकांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने गेल्या काही निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांनी गाण्याच्या सीडी तयार करण्याचा नवा उपक्रम सुरू असून त्यातून अनेक स्थानिक कलावंतांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षाच्या होणाऱ्या सभांमध्ये अनेक लोक कलावंतांना संधी दिली जाणार असल्याचा “ट्रेंड’ कायम राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.

गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या चित्रपटातील गीतांच्या चालीवर विविध राजकीय पक्षाची गीते तयार करून ती सीडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळात वाजविली जातात आणि उमेदवारांचा प्रचार केला जातो. विविध राजकीय पक्षांच्या आणि संबंधित उमेदवारांसाठी सीडी तयार करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ध्वनीमुद्रण स्टुडिओ, सीडी आणि ध्वनीफिती व्यावसायिकसोबत वाद्यवृंद, गायकांना मागणी वाढणार असून तेही सज्ज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

त्यांच्या घरी धावणार राजकीय पक्षांच्या गाड्या

एकदा उमेदवार घोषित झाल्यावर आणि उमेदवारी अर्ज भरल्यावर प्रचाराची एकच राळ मतदारसंघांमध्ये उडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या गाड्या मजूर अड्डा तसेच घरोघरी काम करणाऱ्या महिलांसह बेरोजगार तरुणांच्या घरी सकाळी आठ-नऊ वाजता धावणार असून संध्याकाळी पुन्हा घरी सोडण्यासाठीही धावणार आहेत. तर यावेळी सकाळचा चहा नश्‍ता, दुपारचे जेवण, सायंकाळचा चहा-नाश्‍ताची विविध पक्षांकडून सोय होणार आहे. प्रचारादरम्यान, पत्रकांचे वाटप व घोषणाबाजी करण्याबरोबर उमेदवाराबरोबर दारोदारी सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यातही त्यांना सहभागी केले जाणार आहे.

जनसंपर्कावर भर दिला जाणार

उमेदवार घोषित झाल्यावर उमेदवारांचा घरोघरी जनसंपर्कावर भर दिला जाणार असून वॉर्डामध्ये कार, ऑटो, सायकल रिक्षांमध्ये विविध चित्रपटाच्या चालीवर गीते तयार करून सीडीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार केला जाणार आहे. काही मोठ्या गायक कलावंतांना प्रचार सभेच्या निमित्ताने आमंत्रित केले जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)