शिवशाही बसचा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर डल्ला

सातारा – सातारा बसस्थानकातून पुणे, मुंबईला जाणाऱ्या लालपरी, एशियाड बसेसची संख्या कमी करून महागड्या खाजगी शिवशाही बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. शिवशाही ने पुणे, मुंबईला प्रवास करणे आता सर्वसामान्यांना परवडत नाही.

जबरदस्तीने प्रवाशांना शिवशाहीत बसण्याची सक्ती करून प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारला जातोय अशा प्रतिक्रिया पुणे, मुंबईला नियमित प्रवास करणाऱ्या वर्गाकडून व्यक्त केल्या जात असून महागडी शिवशाही बस बंद केली नाही तर प्रवाशांनी तीव्र आंदोलणाचा इशाराही दिला आहे. दरम्यान साध्या एसटी बस न सोडता शिवशाही बसेस जादा सोडा असा वरूनच फतवा आला आहे अशी माहिती एसटीच्या कर्मचारी वर्गाने नाव न सांगता बोलताना दिली आहे.

एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना सरकारकडून राज्य परिवहन एसटीची महामंडळाची नकळत खाजगी करणाकडे वाटचाल सुरू केली आहे. शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवशाही बस सुरू करून एसटी महामंडळ कर्मचारी वर्गाची वाट लावली आहे. नोकर भरती न करता शिवशाही बससेवा सुरू करुन एसटी चालकांवर उपासमारीची वेळ आणली आहे.

शिवशाही बस सुरू झाल्यामुळे आज अनेक चालक घरी बसून आहेत. शिवशाही बसचा मालक हा खाजगी आहे. ही बससेवा चालू झाली त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी या खाजगी शिवशाही बसला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी या बसेस डेपोत न उभ्या करता रस्त्यावर उभ्या केल्या जात होत्या. आता या शिवशाही बसने आगरातच ठाण मांडले आहे. ही शिवशाही बस ज्या मार्गावर उत्पन्न मिळते त्याच मार्गावर सूर आहे.

सातारा-पुणे, मुंबई, कोल्हापूर-पुणे, मुंबई आशा मार्गावर सध्या शिवशाही बस जोमात सुरू आहे. कोरेगाव, दहिवडी, वडूज, सोलापूर, म्हसवड, फलटण, पाटण या मार्गावर ही शिवशाही बस का? धावत नाहीत. शिवशाहीच्या खाजगी मालकांच्या फायद्यासाठी एसटी बसची लालपरी, एशियाड या मार्गावर धावताना कमी दिसत आहेत, शिवशाही बसच्या खाजगी मालकालाच उत्पन्न मिळावे यासाठी सातारा बसस्थानकातून पुणे, मुंबई जाणाऱ्या विनाथांबा लालपरी आणि एशियाड या बसेस सोडण्याचे प्रमाण कमी केले आहे. लालपरी आणि एशियाड या बसेस बसस्टॉपवर उभ्या असतानाही या बसेस जाणार नाहीत असे प्रवासी वर्गाला सांगून जबरदस्तीने प्रवाशांना शिवशाहीत बसवले जात आहे, असे कर्मचारी खाजगीत बोलत आहेत.

नियमितपणे पुणे, मुंबईला जाणारे प्रवाशी बोलताना म्हणाले, या खाजगी शिवशाही या बसमधून सर्व सामान्य माणसाला पुणे, मुंबईला प्रवास करणे परवडत नाही. पुण्याला जाण्यासाठी साध्या लाल गाडीची तिकीट दर 145 रुपये आहे. तर या शिवशाहीला 220 रुपये स्वारगेट पर्यंत मोजावे लागतात. आता दीपावली सीझनमध्ये तिकिटापेक्षा जादा आकारणी केली जात आहे. शिवशाही बसकडू होणारी लूट थांबवावी अन्यथा प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा बोलताना दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)