विविधा: दादा कोंडके

माधव विद्वांस

चावटपणा सर्वांनाच हवा असतो, पण तो दुसऱ्याच्या तोंडातून, हे हेरून द्व्‌अिर्थी शब्दाची फेक करून लोकांची मने जिंकणारे व “काय ग सखू बोलू का नकू’ अशी सुपर हिट गाणी व “सोंगाड्या’, ‘पांडू हवालदारसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दादा कोंडके यांचा आज स्मृतिदिन (निधन : 14 मार्च 1998) त्यांचा जन्म 8 ऑगस्ट, 1932 रोजी लालबागमधील एका सामान्य गिरणी कामगारांचे पोटी झाला. त्यादिवशी गोकुळाष्टमी होती. झाला म्हणून त्यांचे नाव कृष्णा ठेवले. त्यांच्या कृष्णलीला बालवयातच दिसून येऊ लागल्या. गल्लीत ते दादा म्हणून ओळखले जाऊ लागले.

घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी ‘अपना बझार ‘मध्ये 60 रुपये पगाराची नोकरी पत्करली. तसेच सामाजिक कामाचे आवडीमुळे ते सेवादलाच्या बॅंडमध्ये काम करू लागले. बॅंडवाले दादा या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. सेवादलात असतानाच ते निळू फुले, राम नगरकर यांच्या संपर्कात आले व सेवादलाच्या प्रबोधनप्रद नाटकातून ते अभिनय करू लागले.

त्यांनी ‘दादा कोंडके आणि पार्टी’नावाचे एक कला पथकही काढले. यातून ते वसंत सबनीसांचे संपर्कात आले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनीसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. अभिनयात भाबडेपणा दाखविणाऱ्या तसेच हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनीसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. 1500 च्या वर प्रयोग झालेल्या या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आशा भोसले यांनी ‘विच्छा…’ चे अनेक प्रयोग बघितले व दादांना भालजींकडे पाठविले. वर्ष 1969 मध्ये भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती’ ह्या चित्रपटातून दादांनी पडद्यावर प्रवेश केला.

दादा बघता बघता लेखक, गीतकार,अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सबकुछ झाले. त्यांचा सोंगाड्या पडद्यावर आला, त्यातील गाणी आणि त्यांचे विनोदही सुपरहिट झाले. त्यानंतर त्यांनी त्यांची स्वतःची “कामाक्षी प्रॉडक्‍शन’ चित्रपट निर्मिती कंपनी काढली व 16 सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले. वर्ष 1970 मध्ये त्यांचा सोंगाड्या आला. दादांनी ग्रामीण जीवन त्यातील फसवणूक,राजकारण, गावगुंड्या, गावरान विनोद, आपुलकी खुबीने चाहत्यांचे साठी चित्रपटात उभे केले. त्यांनी त्यांचे काही चित्रपट गुजराथी व हिंदीमधूनही प्रदर्शित केले. त्यांच्या “सोंगाड्या’चे प्रदर्शनाचे वेळी कोहिनूर चित्रपटगृहाचे मालकाने त्यांचे बुकिंग डावलून देव आनंदचे ‘तीन देवीयॉं’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले.

दादांनी त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचेकडे कैफियत मांडली. शिवसैनिक चित्रपटगृहाबाहेर जमा झाले. वातावरण पाहून मालकाने शरणागती पत्करली “सोंगाड्या’ दिमाखात सुरू झाला.त्यानंतर दादा शिवसेनेचे पाईक झाले.शिवसेनेचे ते स्टार प्रचारक झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)