भाजपचे ज्येष्ठ नेते लालक़ृष्ण आडवाणी यांनीही अर्पण केली श्रद्धांजली दादा
पुणे – दादा जे. पी. वासवानी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालक़ृष्ण आडवाणी यांनी शनिवारी साधू वासवानी मिशनला भेट दिली. याप्रसंगी आयोजित प्रार्थना कार्यक्रमात सहभागी होत, त्यांनी दादा वासवानी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
साधू वासवानी मिशनतर्फे दादा जे.पी. वासवानी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त तीन दिवसीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखंड कीर्तन, भजन, अन्नदान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या महायज्ञाच्या तिसऱ्या दिवशी आडवाणी यांनी कार्यक्रमात सहभागी होत दादा वासवानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दादा वासवानी आणि आडवाणी यांचे अतिशय जवळचे संबंध होते. आडवाणी हे दादांना आपले श्रद्धास्थान मानत. दादांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आडवाणी नेहमी त्यांना भेटायला येत असत. आजही त्यांनी या कार्यक्रमाला येऊन यामध्ये सहभाग नोंदविला.
याप्रसंगी मिशनतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 113 गरजू नागरिकांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. तसेच गरिबांसाठी अन्नछत्राचे आयोजनदेखील करण्यात आले होते.