राज्यातील 757 महाविद्यालयांनी दाखल केले 36 हजार अर्ज दि. 7 ते 17 जून कालावधीत
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जूनमध्ये घेण्यात येणाऱ्या डी.टी.एड. व डी.एल.एड. परीक्षेसाठी 35 हजार 886 विद्यार्थ्यांचे अर्ज अध्यापक विद्यालयांनी दाखल केले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 10 हजारांच्या अर्जांची घट झाली आहे. गेल्या वर्षी एकूण 45 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. सन 2004 व 2016 च्या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी अध्यापक शिक्षण पदविका परीक्षा (डी.टी.एड.) व प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा (डी.एल.एड.) घेण्यात येत असतात.
आता येत्या दि.7 ते 17 जून या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यासाठी दि.13 ते 26 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. दि.27 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात आली होती. त्यानंतर 3 एप्रिलपासून अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यंदाच्या परीक्षेसाठी महाविद्यालयांनाही नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
या मुदतीत एकूण 757 महाविद्यालयांनी परीक्षा परिषदेकडे ठराविक नोंदणी शुल्क भरुन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थींनी प्रवेश घेतले नसल्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. डी.टी.एड.च्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी केवळ 122 विद्यार्थ्यांनी तर द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी 5 हजार 899 अशा एकूण 6 हजार 21 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. डी.एल.एड.च्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी 14 हजार 422 तर द्वितीय वर्षासाठी 15 हजार 443 अशा एकूण 29 हजार 856 विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सहाय्यक आयुक्त अलका मुळीक यांनी दिली आहे. पत्राद्वारे डी.टी.एड.चे प्रशिक्षण घेतलेल्या 6 विद्यार्थ्यांचेही परीक्षेसाठी अर्ज दाखल झाले आहेत.