गरज सायबर विम्याची

डिजिटल व्यवहारामध्ये सायबर हल्ल्याची जोखीम अधिक असते. त्यामुळे विमा कंपन्यांनी आर्थिक बाजारात सायबर इन्शुरन्स पॉलिसी आणली आहे. सध्या ही पॉलिसी डिजिटल व्यवहार करणाऱ्या आर्थिक कंपन्यांसाठी आहे. त्यानंतर ही पॉलिसी डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी देखील उपलब्ध होईल. त्यामुळे आपण सायबर विमा उतरवलेल्या बॅंक किंवा वित्त कंपनीच्या माध्यमातूनच व्यवहार केल्यास बॅंकेला आणि आपल्याला आर्थिक फटका सहन करावा लागणार नाही.

काळा पैशावर लगाम घालण्यासाठी सरकारने डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन दिले. त्यामुळे ऑनलाईन सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात उतरल्या. त्यात पेटीएम, मोबिक्विक, पेपल, एअरटेल मनी, सिटी मास्टरपास, सिटरस पे, ईजी टॅप, फ्रीचार्ज, एचडीएफसी पे जॅप, आयसीआयसीआय पॉकेट, जिओ मनी, ओला मनी, पेयू मनी, एसबीआय बडी आणि पेमेंट सारख्या डझनभर कंपन्यांनी डिजिटल बाजारात धूम केली आहे. दोन तीन वर्षांत या कंपन्यांचा बाजार अनेक पटीने वाढला आहे. साहजिकच बाजार वाढल्याने या प्लॅटफॉर्मच्या वापराचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. दुसरीकडे वाढत्या ऑनलाईन व्यवहारामुळे ग्राहकांची आर्थिक सुरक्षादेखील जोखमीची बनली. ऑनलाईन गैरव्यवहाराच्या घटना वाढल्या. त्यामुळे देशात सायबर इन्शुरन्स पॉलिसीची गरज भासू लागली. विशेष म्हणजे दोन वर्षात विविध बॅंकांतून सुमारे 32 लाख डेबिट कार्डच्या एटीएमची माहिती चोरीस गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला. ही नुकसानभरपाई बॅंकांना आपल्या खिशातून करावी लागली आहे. अशा प्रकारच्या व्यवहारातून आर्थिक फटका बसू नये असे ग्राहकांबरोबर बॅंक आणि वित्तीय कंपन्यांना वाटते. त्यामुळे सायबर विमा पॉलिसीची निकड भासू लागली.

सायबर विमा उद्योगाचा आकार
देशात सायबर विमा उद्योगाचा आकार फारसा मोठा नाही. एकूणात सायबर इन्शुरन्सचा बाजार हा सुमारे 60 कोटी रुपये इतका आहे. अनेक विमा कंपन्यांनी आपल्या नियमित विमा पॉलिसीतूनच अतिरिक्त सायबर सुरक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचा वापर करणाऱ्या रिटेल यूजरसाठी विमा कंपन्यांकडे सध्या वेगळी कोणतीही पॉलिसी नाही. अर्थात, विमा कंपन्या अशा प्रकारच्या पॉलिसीवर काम करत आहेत आणि लवकरच बाजारात सामान्यांसाठी सायबर सुरक्षेशी निगडीत असलेली पॉलिसी येईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामान्यांनी काय करावे?
आतापर्यंत सायबर सुरक्षेशी निगडीत कोणतीही विमा पॉलिसी बाजारात नसल्याने ऑनलाईनवर व्यवहार करताना सुरक्षा कशी बाळगावी असा प्रश्न डिजिटल व्यवहार करणाऱ्या मंडळींना पडला आहे. अशा स्थितीत ज्या बॅंकांनी किंवा वित्तीय कंपन्यांनी डिजिटल व्यवहारासाठी सायबर विमा उतरवला आहे, अशा कंपन्यामार्फत डिजिटल व्यवहार करावेत. ऑनलाईन व्यवहारासाठी ज्या प्लॅटफॉर्मचा आपण वापर करणार आहोत, तेथे नोंदणी करण्यापूर्वी त्या कंपनीने सायबर विमा घेतला आहे की नाही, हे तपासून पाहावे. शॉपिंग करताना देखील हेच धोरण ग्राहकांनी राबवले पाहिजे. ज्या ई- कॉमर्स कंपनीकडून आपण खरेदी करत आहोत, त्या कंपनीने सायबर सुरक्षा विमा कवच घेतलेले आहे की नाही, हे पाहावे. अशा प्रकारची खबरदारी ही आपल्या आर्थिक व्यवहाराला सुरक्षित करते. सायबर सुरक्षा विमा ही यूजरला आर्थिक फटक्यापासून वाचवते.

सायबर सुरक्षा कवच कसे घ्यावे?
ऑनलाईन सेवा देणाऱ्या एखाद्या कंपनीबरोबर व्यवहार करताना जर काही गडबड झाली तर त्याच्या यूजरला जो आर्थिक फटका सहन करावा लागतो, त्याची भरपाई विमा कंपनीकडून केली जाते. बॅंक किंवा वित्तीय संस्थांना सायबर विमा कवच देणाऱ्या कंपन्यात एचडीएफसी एर्गो, न्यू इंडिया इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोंबार्ड, बजाज अलायन्स, टाटा एआयजी आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा समावेश आहे. या कंपन्या ग्राहकांना त्यांची सेवा आणि उपकरणावर सायबर विमा कवच प्रदान करण्याचे काम करतात.

– सतीश जाधव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)