वैचारिक : सैन्यकपातीचा आत्मघात (भाग १)

संग्रहित छायाचित्र...
हेमंत महाजन (बिग्रेडीयर) 
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी “आम्हाला सैन्याची गरज नाही; पोलीस अतंर्गत सुरक्षेसाठी पुरेसे आहेत. तसेच भारत आणि चीनमध्ये युद्ध होणार नाही आणि जरी झाले तरी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हे युद्ध थांबवू शकतो ‘ असे म्हटले होते. पण त्यांचा हा आशावाद फोल ठरलेला देशाने पाहिले. उलट 1962 च्या युद्धात चीनविरुद्ध आपला पराभव झाला कारण तेव्हा लढाई कशी करायची हेच माहीत नव्हते. आता हाच इतिहास पुन्हा उगाळला जात आहे. पारंपरिक युद्धाच्या शक्‍यता कमी झाल्याने इतक्‍या मोठ्या संख्येने असणाऱ्या सैन्याची गरज काय असा एक विचारप्रवाह शासनदरबारी घुटमळतो आहे. याविषयाचे पैलू उलगडणारा आणि सैन्यकपातीला पर्याय सुचवणारा लेख. 
विद्यमान सरकारने सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्राविषयी आणि लष्कराविषयी एका प्रमुख मुद्दयावर विचारमंथन करण्यात आले. अलीकडील काही वर्षांत पारंपरिक युद्धे बंद झालेली आहेत. त्यामुळे 1947, 1965, 1971 आणि 1999 साली झाली तशी शत्रुशी पारंपरिक युद्ध होण्याची शक्‍यता फारच कमी झाली आहे. परिणामी, सैन्यदलाकडे पारंपरिक युद्ध हे मुख्य काम राहणार नाही. तथापि, आपल्याला सैन्य तयार ठेवावेच लागेल; कारण आपल्या सज्जतेमुळे शत्रु आपल्यावर हल्ला करण्याची योजनाच करू शकणार नाही. सध्या चीन सैन्यकपात करत आहे. त्यामुळे एवढे सैन्य भारताने बाळगावे का असा विचार या बैठकीत करण्यात आला. सध्या भारताची सैन्यदलाची संख्या 12.5 लाख आहे, हवाईदलाची संख्या 1 लाख ते 1लाख 20 हजार या दरम्यान आहे. नौदलाची संख्या ही 50 हजार ते 65 हजार एवढीच आहे. एवढे सैन्यदल आपल्याला गरजेचे आहे का किंवा यामध्ये काही कमी करणे आवश्‍यक आहे का, याविषयीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय सैन्याने एक अभ्यास गट तयार केला. त्याविषयी माध्यमांमधून बरेच लेखन होत आहे. यासंदर्भात काही प्रमुख गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी “आम्हाला सैन्याची गरज नाही; पोलीस अतंर्गत सुरक्षेसाठी पुरेसे आहेत. तसेच भारत आणि चीनमध्ये युद्ध होणार नाही आणि जरी झाले तरी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हे युद्ध थांबवू शकतो ‘ असे म्हटले होते. पंडीत नेहरूही शांतताप्रिय नेते होते. त्यांना शेजारील सर्वच देशांशी मैत्री करण्याची इच्छा होती. 1947 ते 1963 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. परंतु त्यामुळे भारत पाकिस्तान, भारत चीन यांच्यामध्ये कधीही शांतता निर्माण झाली नाही. 1947 मध्ये नेहरुंच्याच काळात भारतीय सैन्य पाकिस्तानविरोधात युद्ध लढले; त्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम हा भारतीय सैन्यामुळेच यशस्वी झाला. काश्‍मीर पाकिस्तानात जाण्यापासून भारतीय सैन्यानेच वाचवले. 1962 च्या युद्धात चीनविरुद्ध आपला पराभव झाला कारण त्यावेळच्या नेतृत्वाला लढाई कशी करायची हेच माहीत नव्हते. आता हाच इतिहास पुन्हा उगाळला जातो आहे का?
सैन्याची ताकद का कमी करायचीय?

यासाठी काही कारणे दिली जातात. यातील पहिले कारण पारंपरिक युद्धाची शक्‍यता कमी झालेली आहे. हे खरे आहे का? आज भारत -चीन सीमेवर चीन 40 डिव्हीजन म्हणजे 5-6 लाख सैन्य आणू शकतो अशी स्थिती आहे. एवढ्या प्रचंड चीनी सैन्याशी आपल्याला सामना करता येणे आवश्‍यक आहे. भारत -चीन युद्ध झाले तर त्याच वेळी पाकिस्तानही भारतावर हल्ला करू शकतो. त्यामुळे साहजिकच पाकिस्तान सीमेवर असणारे सैन्य भारत चीनशी लढण्यासाठी हलवू शकत नाही. पाकिस्तान सीमेचे सैन्य वेगळे आणि चीनशी लढणारे सैन्य वेगळे असेल. लढाई सुरु झाली तर अंतर्गत सुरक्षेची आव्हाने उसळून येतील.
त्यामध्ये पाकिस्तानचे छुपे दहशतवादी हल्ले करण्यास सुरुवात करतील. काश्‍मिरात दगडफेक सुरु होईल. माओवादी किंवा नक्षलवादी मध्य भारतात अचानक हल्ले सुरु करतील. बांग्लादेशी घुसखोर जे वेगवेगळ्या भागात घुसलेले आहेत तेसुद्धा आव्हाने देतील. यामुळे केवळ सीमेकडेच नाही तर देशांतर्गत सुरक्षेकडेही लक्ष ठेवावे लागेल. म्हणूनच पहिले कारण हे अप्रस्तुत आणि दूरदृष्टीचा अभाव असणारे आहे.
गुप्तचर दलांचे एकत्रीकरण 
योग्य वेळी गुप्त माहिती मिळाल्यास आपले रक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. सैन्याला पाकिस्तान आणि चीन सीमेवरची गुप्त वार्ता मिळवण्याचा अधिकार आहे हाच अधिकार इतर सीमांवर आणि मध्यभागेत नक्षलवादाविषयी का दिला जाऊ शकत नाही जेणेकरून गुप्तचर माहितीचा दर्जा अधिक चांगला होऊ शकतो.

सागरी सुरक्षा कमजोर 

7 हजार 600किलोमीटरचा सागरकिनारा लाभलेला असताना त्याचे किनाऱ्यावर संरक्षण कऱण्यासाठी कोणीही नाही. गरज पडल्यास या किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी थोडे सैन्य ठेवण्याची गरज आहे. कमीत कमी प्रत्येक समुद्र किनाऱ्यावरील राज्याकरिता आपण एक बटालियन नियुक्त करु शकतो का? आपली द्वीपसमूह, वेटे ही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आहेत. अंदमान – निकोबार द्वीपसमूहातील काही बेटांवरच मानवी वस्ती आहे. एवढ्या प्रचंड द्वीपसमूहाचे रक्षण करण्यासाठी सैन्य तिथे ठेवता येऊ शकते का? सध्या तिथे एक ब्रिगेड म्हणजे 2-3000 सैन्य आहे, ते तिन पटीने वाढवण्याची गरज आहे.


सैन्यकपातासाठी दुसरे कारण दिले जाते ते आर्थिक. आज एकंदर अर्थसंकल्पापैकी सामाजिक उपक्रमांसाठी आणि गरीबीत खितपत पडलेल्या भारतीय जनतेला वर काढण्यासाठी बराच पैसा खर्च होत असतो. परिणामी, अर्थसंकल्पामध्ये सैन्यासाठी काही राहात नाही.
अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढले असले तरीही सरकारचे उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे सरकार विविध करांमुळे प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाएवढाच पैसा खर्च करू शकते. आज देशात अनेक भारतीय श्रीमंत होत आहेत पण कर देणाऱ्या भारतीयांची संख्या दोन किंवा तीन टक्केही नाही. त्यामुळे सरकारला कोणत्याही सरकारी योजनेकरिता पुरेसा निधी मिळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. समाजातील विविध घटकांच्या “सरकारने आपल्यासाठी काय करावे’ ह्या अपेक्षा इतक्‍या जास्त वाढलेल्या आहेत की सैन्याच्या आधुनिकीकरणाकरिता निधी वाढण्याची शक्‍यता कमी आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)