वैचारिक : सैन्यकपातीचा आत्मघात (भाग २)

संग्रहित छायाचित्र...
हेमंत महाजन (बिग्रेडीयर) 
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी “आम्हाला सैन्याची गरज नाही; पोलीस अतंर्गत सुरक्षेसाठी पुरेसे आहेत. तसेच भारत आणि चीनमध्ये युद्ध होणार नाही आणि जरी झाले तरी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हे युद्ध थांबवू शकतो ‘ असे म्हटले होते. पण त्यांचा हा आशावाद फोल ठरलेला देशाने पाहिले. उलट 1962 च्या युद्धात चीनविरुद्ध आपला पराभव झाला कारण तेव्हा लढाई कशी करायची हेच माहीत नव्हते. आता हाच इतिहास पुन्हा उगाळला जात आहे. पारंपरिक युद्धाच्या शक्‍यता कमी झाल्याने इतक्‍या मोठ्या संख्येने असणाऱ्या सैन्याची गरज काय असा एक विचारप्रवाह शासनदरबारी घुटमळतो आहे. याविषयाचे पैलू उलगडणारा आणि सैन्यकपातीला पर्याय सुचवणारा लेख. 
डिफेन्स बजेटमधील 80 ते 85 टक्के भाग हा रोजच्या कारभारावर खर्च होतो. परिणामी, आधुनिकीकरण करण्यासाठी मिळणारा पैसा 10 ते 15 टक्के सुद्धा नसतो. त्यामुळेच सैन्याची ताकद कमी केल्यास आधुनिकीकरणाचा गाडा पुढे नेता येईल अशी मांडणी केली जाते. भारतीय सैन्याची ताकद 1972 पूर्वी 12.5 ते 13 लाख होती आणि आज 2018 मध्येही ती तेवढीच आहे. याचा अर्थ सैन्याची ताकद इतक्‍या वर्षात अजिबात वाढलेली नाही. याउलट भारतीय पोलिस दल, अर्धसैनिक दले, बीएसएफ, पॅरामिलिटरी फोर्सेस यांची संख्या 1972 मध्ये सहा लाखांच्या आसपास होती ती आज जवळपास 24 लाख म्हणजेच जवळपास चार पट वाढली आहे. मात्र अंतर्गत सुरक्षेची आव्हाने कमी झाली आहेत का? भारत आतून अधिक सुरक्षित झाला आहे का? तर याचे उत्तर आहे अजिबात नाही.
नोकरशाहीने राज्यकर्त्यांची अशी समजूत करून दिलेली आहे की सैन्याची ताकद वाढल्यास पाकिस्तानातील लष्कराप्रमाणे एखाद्या वेळी भारतीय सैन्यही बंड करून देशाचे राज्यकर्ते बनू शकतात. हा केवळ दिशाभूल करणारा प्रकार आहे. भारतीय सैन्य अशा प्रकारच्या कारवायांपासून सुरुवातीपासूनच दूर आहे. भारतावर सैन्याचा अंमल येण्याची शक्‍यता शून्य आहे. परंतु नोकरशाहीने घाबरवल्याने सैन्याला प्रतिउत्तर म्हणून पोलीस, अर्धसैनिक दले यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे सैन्याने बंड केल्यास इतर अर्धसैनिक दलांच्या मदतीने हे बंड मोडून काढता येईल, असा विचार यामागे आहे. खरे म्हणजे या सर्वच दलांची लढण्याची क्षमता फ़ार कमी आहे.
या पार्श्वभूमीवर जर पारंपरिक युद्ध शक्‍यता कमी होत असेल तर 12 ते 13 लाख सैन्याचा वापर देशाच्या रोजच्या सुरक्षेकरता कसा करता येईल हे पाहणे आवश्‍यक आहे. सध्या सैन्याचा वापर बाह्य सुरक्षा म्हणजे भारत चीन सीमा, भारत पाकिस्तान सीमा रक्षणाकरता केला जातो. अंतर्गत सुरक्षाकरता म्हणजे काश्‍मिरमध्ये सुरु असलेला हिंसाचार रोखणे, किंवा ईशान्य भारतातील मणिपूर, नागालॅंडमध्ये सुरु आहे. याशिवाय जे भारतीय सैन्य मोठ्या शहरात आहे व प्रशिक्षण करत आहे त्यांचे काय करता येईल? अंतर्गत सुरक्षा देखील सैन्याचे मोठे काम आहे.
गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्यात हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे आंदोलकांनी नुकसान केले, अशा काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सैन्याचे पण काम आहे. त्याकरिता सैन्याला का वापरण्यात आले नाही? भारताच्या वेगवेगळ्या भागात अशाच प्रकारची आंदोलने झाली तेव्हा सैन्याचा वापर का करण्यात आला नाही? जर पोलिसांना 2-3 दिवसात परिस्थिती नियंत्रणात आणता येत नसेल तर सैन्याचा वापर करून देशाच्या संपत्तीचे होणारे नुकसान टाळता येणे शक्‍य आहे.
आज बांग्लादेशच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होते. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवरून अफू गांजा या अंमली पदार्थांची तस्करी होते आहे. तर अशा ठिकाणच्या सीमेवर लक्ष ठेवणारे सीमा सुरक्षा दलासारख्या संस्था भारतीय सैन्याच्या अधिपत्याखाली का येऊ शकत नाहीत. जेणेकरून त्यांची लढण्याची क्षमता वाढेल आणि या सीमेवरून तस्करी, बनावट नोटांचा व्यापार, दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात यश येईल.
भारतीय सैन्याच्या नेतृत्वाचा आणि प्रशिक्षणाचा दर्जा अत्यंत उत्तम आहे. आपली अर्धसैनिक दले जी माओवादी भागात आहे त्यांची दर्जा सुधारण्याची गरज आहे. भारतीय सैन्याच्या जम्मू काश्‍मिरमधील दहशतवादी विरोधातील अभियानात रोज 2-3 दहशतवादी मारले जातात. आज माओवादी भागात जवळपास दुप्पट ते तिप्पट अर्धसैनिक दले आहेत मात्र तिथे माओवादी मारले गेल्याची बातमी येत नाही काऱण त्यांचे नेतृत्व आणि लढण्याची क्षमता. हे ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने भारतीय सैन्याकडून केले जाऊ शकते.
भारतीय सैन्याचा वापर आपत्तीकाळात केला जातो. जसे केरऴामध्ये आलेल्या पुरामध्ये लष्कराने जसे चांगले काम केले तसे इतर ठिकाणी केले जाऊ शकते का?भरमसाठ अर्ध सैनिक दले वाढवण्याची काय गरज आहे? थोडक्‍यात सध्या असलेल्या भारतीय सैन्याचा देशाच्या सुरक्षेकरता खूप चांगला वापर करता येईल.
आज सायबर लढाई रोजच चालु आहे. भारतीय सैन्याची सायबर वॉरची क्षमताही प्रचंड आहे. त्याचाही वापर का करु शकत नाही. सोशल मिडीया मध्ये भारतविरोधी भस्मासूर तयार झालेला आहे तो देशाच्या विरोधात, देशाच्या हितसंबंधाच्या विरोधात कारवाई करतो. देशाच्या विरोधात सोशल मीडियावरती वाईट बातम्या वाचायला मिळतात. चांगल्या बातम्या कमी असतात. या रोखण्यासाठीही सैन्याचा वापर करु शकतो का? म्हणजे जे सैन्य भारत चीन सीमा, भारत पाक सीमा काश्‍मिर व ईशान्य भारतात नाही, त्यांचा वापर इतर आव्हानांना तोंड देण्याकरिता केला जाऊ शकतो त्यासाठी सैन्याची ताकद कमी न करता इतर अपारंमपारिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम केले पाहिजे. हाच आत्ता सर्वोत्तम उपाय आहे.
सैन्य कमी करणे भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे. सरकार आणि भारतीय सैन्याचे नेतृत्व या सर्वांचा विचार करून यावर कारवाई करेल अशी आशा आहे. पारंपरिक लढाईची शक्‍यता जरी कमी झाली असली तरीही ती होणारच नाही असे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. म्हणूनच सध्याच्या सैन्याचा उपयोग आपण अपरंपारिक आव्हांनांना तोंड देण्यासाठी तयारी केली पाहिजेच पण पारंपरिक लढाईकरिता पण सज्ज राहिले पाहिजे.
What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)