चेन्नई – गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीनंतर फलंदाजांच्या शिस्तबद्ध खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर सात गडी आणि सोळा चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला.
यावेळी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 9 बाद 108 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनने धडाकेबाज सुरुवात करत पहिल्याच षटकात 12 धावा वसूल केल्या. मात्र, 17 धावा करून तो परतला. यानंतर आलेल्या सुरेश रैनाने देखील आल्यापासून फटकेबाजी केली. मात्र, 14 धावा करून तो परतला. यानंतर आलेल्या अंबाती रायडूला साथीत घेत सलामीवीर फाफ ड्यु प्लेसिसने अर्धशतकी भागीदारी नोंदवली. ही जोडी विजय मिळवून देईल असे वाटत असताना 21 धावा करून रायडू परतला. यानंतर आलेल्या केदार जाधवला साथीत घेत ड्यु प्लेसिसने 17.2 षटकांत चेन्नईला 111 धावा करून देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी प्लेसिसने नाबाद 43 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. ख्रिस लिन आणि सुनील नारायण हे केवळ आठ धावांमध्येच परतले. तर, नितीश राणाच्या रूपाने कोलकाताला तिसरा धक्का बसला. यानंतर रॉबिन उथप्पा आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, उथप्पादेखील परतल्याने कोलकाताला चौथा धक्का बसला. त्यामुळे कोलकाताची धावगती मंदावली.
दिनेश कार्तिकही मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाल्याने कोलकाताला पाचवा धक्का बसला. तर गिल देखील केवळ 9 धावा करून परतल्यानंतर आंद्रे रसेलने आधी पियुष चावलाच्या साथीत संघाचा डाव सावरला. आंद्रे रसेलने हॅरी गर्नेला साथीत घेत फटकेबाजी करत कोलकाताला 108 धावांची मजल मारून दिली.