सात-बारावर तलाठ्यांच्या सही-शिक्‍क्‍यासाठी गर्दी

विमा भरण्याची एकच दिवस मुदत

एका तलाठ्याकडे अनेक गावे असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. विमा भरण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असल्याने ही गर्दी वाढत आहे. त्यामुळे पूर्वीचा डिजिटल सातबारा ग्राह्य धरावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

जामखेड – खरीप हंगाम 2019 करिता पीकविमा भरण्यासाठी तलाठ्याची सही, शिक्का असणारा सातबारा हा बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सात-बारावर तलाठ्याचा सही-शिक्का घेण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र तालुकाभरात दिसत आहे. त्यातच एकेका तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार असल्याने शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या शोधात एका गावातून दुसऱ्या गावात फिरण्याची वेळ आली आहे.

पीकविम्यासाठी आवश्‍यक सात-बारावर तलाठ्याचा शिक्का-सही घेण्यासाठी शेतकऱ्यांना तो गावात भेटत नसल्याने धावपळ करावी लागत आहे. एकीकडे सतत नेट बंदसह अनेक कारणांमुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे तलाठ्याच्या सही-शिक्‍क्‍याचा सातबारा मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जामखेड तालुक्‍यातील शेतकरी दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला झालेल्या थोड्याफार पावसानंतर निसर्गावर भरोसा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला असून, यामुळे शेतकऱ्यांची मनःस्थिती दोलायमान झाली आहे.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पीकविमा काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, सात-बाऱ्याअभावी मोठ्या अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच उधार ऊसनवारी करून लागवड केलेले पीकही निसर्गाच्या अवकृपेमुळे हाती न लागल्यामुळे अडचणीत भर पडली. पिकांना विमा संरक्षण मिळावे, या हेतूने सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे.

मागील काही वर्षापासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे या पीकविम्याचा शेतकऱ्यांना थोडाफार आधार मिळत आहे. यामुळे पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु, यामध्ये सातत्याने सोयीनुसार समाविष्ट होणाऱ्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी दमछाक होताना दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)