सेतू कार्यालयात गर्दी

सातारा – शाळा तसेच महाविद्यालये सुरू झाल्याने प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी येथील तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रात प्रचंड गर्दी होत आहे. एका दाखल्यासाठी किमान पाच खिडक्‍यांकडे कागदपत्रे पाठवावी लागत असल्याने दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पाल्यांचा तासनतास वेळ वाया जात आहे. तहसील कार्यालयात दाखला कमी वेळेत मिळविण्यासाठी ओळखी अन्‌ चिरीमिरीदेखील सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या शाळा, महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्न, नॉन क्रिमिनल आदी दाखल्यांची पूर्तता करावी लागत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र म्हणजेच सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी होत आहे. दररोज जवळपास पाचशेहून अधिक नागरिक दाखल्यासाठी अर्ज करीत आहे. परंतु हे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे.

दाखले मिळविण्यासाठी येथील पाच खिडक्‍यांना कागदपत्रे फिरवली जात असून, अर्जांची संख्या पाहता या कार्यालयाच्या खिडक्‍यांची संख्या मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे दाखले वेळेत मिळविण्यासाठी पालकांची धडपड नजरेस पडत आहे. अर्ज घेण्यापासून प्रतिज्ञा पत्र देईपर्यंत प्रत्येक खिडकीत तासनतास जात असल्याने दाखल्यासाठी किमान दोन- तीन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावर पर्याय म्हणून शासनाने किमान जुलै महिन्यात तरी खिडक्‍यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. दरम्यान, कमी वेळेत दाखले मिळावेत, म्हणून अनेकांची धडपड सुरू आहे. यासाठी सेतू कार्यालयाच्या प्रवेशदारातून अर्ज घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)