मोदींवर टीका करणे पत्रकार पडले महागात : एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात

इंफाल: केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणे मणिपूरमधील एका पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. या पत्रकाराला मंगळवारी (दि.18) राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

किशोरचंद वांगखेम असे या पत्रकाराचे नाव आहे. किशोरचंद यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी पश्‍चिम इंफाळमधल्या स्थानिक न्यायालयाने त्यांना 70 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन दिला होता. जामीन देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, ही सुटका झाल्यानंतर रासुकाच्या सल्लागार मंडळाने किशोरचंद यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात घेण्यावर शिक्कामोर्तब केले. सल्लागार मंडळाच्या सांगण्यानुसार, या पत्रकाराचा इतिहास बघता, तो पुन्हा आक्षेपार्ह वर्तणूक करेल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होईल. त्यामुळे रासुका कायद्याच्या 13व्या कलमाअंतर्गत त्याला बारा महिन्यांपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवणे योग्य आहे, असे नमुद केले.

किशोरचंद यांचे कुटुंबीय त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्‍यता आहे. रासुकाअंतर्गत कोणालाही कमाल 12 महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येते. भारतीय पत्रकार संघ आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने किशोरचंद यांच्या अटकेचा निषेध केला आहे. रासुका हा कायदा अत्यंत मागास असून अन्यायकारक असल्याचे मत यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, रासुकाच्या सल्लागार मंडळाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत मणीपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनीही या निर्णयावर सही केली करत किशोरचंद यांच्या या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)