पॅरीस – अमेरिकी बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर युरोपातील देशांनी जास्ती संरक्षण खर्च करू नये, अशा शब्दामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांच्याबरोबर संरक्षण विषयी मतभेद झाल्याच्या पार्श्वभुमीवर एका मुलाखतीमध्ये मॅक्रो यांनी ही थेट टीका केली आहे.
पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जगभरातील नेते पॅरीस येथील युद्धस्मारकास भेट देण्यासाठी येत आहेत. ट्रम्प यांनीही यांनी पॅरीसमध्ये आल्या आल्या केलेल्या टिप्पणीचा समाचार मॅक्रो यांनी या मुलाखतीतून घेतला. खऱ्या युरोपियन सैन्याची गरज आहे हे मॅक्रो यांचे मत अपमानास्पद असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.
आपल्या कार्यालयाच्या निवेदनातून ट्रम्प यांचा गैरसमज झाला आहे, असे स्पष्टिकरण मॅक्रो यांनी दिले. “नाटो’मध्ये अधिक चांगली भागीदारी असायला पाहिजे. युरोपाला अमेरिकेच्या युद्धसामुग्रीवर अवलंबून रहायला लागायला नको, असे स्पष्टिकरण मॅक्रो यांनी दिले. थेट सांगायचे तर युरोपातील देशांनी अमेरिकेची युद्धसामुग्री खरेदी करण्यात आपले संरक्षण अंदाजपत्रक घालवू नये, असेच आपल्याला म्हणायचे होते, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
बेल्जियमकडून युरोपातील विमानांऐवजी अमेरिकन बनावटीची लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या निर्णयावर मॅक्रो यांनी गेल्या महिन्यात टीका केली होती. हा निर्णय युरोपाच्या हिताविरोधात असल्याचे ते म्हणाले होते. संरक्षणाबाबत युरोपाने सूत्रे हाती घ्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा