भारतावर अधिक दहशतवादी हल्ले झाल्यास गंभीर स्थिती : अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

वॉशिंग्टन – भारतावर यापुढे अधिक दहशतवादी हल्ले झाल्यास ते गंभीर स्थिती निर्माण होईल अशा शब्दामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहंम्मदसह दहशतवादी संघटनांवर ठोस आणि स्थायी स्वरुपाची कारवाई करावी, असेही अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. आज व्हाईटहाऊसच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला आहे.

पाकिस्तानला आर्थिक कारवाईचा धाक…
पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. “फायनान्शियल ऍक्‍शन टास्क फोर्स’च्या कारवाईच्या भीतीमुळे तरी पाकिस्तानला अशा दहशतवादी गटांवर कारवाई करावी लागेल. अन्यथा हा टास्क फोर्स पाकला करड्या यादीत टाकू शकतो. जबाबदार देश म्हणवून घेऊन उपलब्ध आर्थिक यंत्रणांचा लाभ घ्यायचा का दहशतवादी गटांवर कारवाई न केल्यामुळे वाळीत टाकल्यासारखी अवस्था करून घ्यायची, याचा निर्णय आता पाकिस्तानने घ्यायचा आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहिद झाले होते. तेंव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केले. हा तणाव आम्ही अधिक वाढवू नये, असे पाकिस्तानला वाटत असेल, तर प्रामुख्याने जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी गटांवर ठोस आणि स्थायी स्वरुपाची कारवाई व्हायला हवी. पाकिस्तानकडून अशी कारवाई केली जाईल, हे आता आम्हाला पहावे लागेल, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

पाकिस्तानकडून अशा दहशतवादी गटांवर प्रामाणिकपणे, गांभीर्याने आणि ठोस कारवाई झाली नाही आणि भारतात आणखी दहशतवादी हल्ले झाले तर ही पाकिस्तानसाठी अत्यंत गंभीर परिस्थिती असेल. त्यामुळे तणाव पुन्हा वाढू शकतो. हा ताण दोन्ही देशांसाठी धोक्‍याचा असू शकतो, असे या अधिकाऱ्याने स्वतःची ओळख उघड न करता सांगितले.
पुलवामा हल्ला आणि भारताचा एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता अशी कारवाई पाकिस्तानकडून होण्याची वाट आंतरराष्ट्रीय समुदाय अजूनही बघत असून इतक्‍यातच त्याचे पूर्ण विश्‍लेषण करता येणार नाही. मात्र पाकिस्तानने काही प्राथमिक कारवाई केली आहे.

काही दहशतवादी गटांची मालमत्ता गोठवली असून काही जणांना अटकही केली आहे. जैशच्या काही संस्थांचा ताबाही घेतला आहे. मात्र एवढे पुरेसे नाही. कायमस्वरुपी कारवाई हवी, कारण यापूर्वी अटक झालेले काही महिन्यातच सुटत असायचे. दहशतवादी देशभर हिंडत असतात आणि उघडपणे सभाही घेतात. हे दहशतवादी खूप काळापासून कार्यरत आहेत. त्यामुळे अमेरिकेला कायम टिकणारी कारवाई हवी आहे. असे या अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव निवळला आहे. पण दोन्ही देशांचे सैन्य सज्ज आणि सतर्क आहे. त्यामुळे कोणत्याही देशाकडून अतिरिक्‍त्‌ लष्करी कारवाई झाल्यास ती अमान्य असेल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)