संकट घोंगावतंय! (अग्रलेख)

इंटरगव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी-प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्व्हिसेसने (आयपीबीईएस) काही दिवसांपूर्वीच पॅरिसमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालातील मुद्दे भयावह आहेत. जैवविविधतेवर घोंगावत असलेल्या संकटाविषयी प्रकाशित करण्यात आलेला हा अहवाल जगभरातील सरकारांच्या डोळ्यांत अंजन घालणारा असून, आपण आताच परिस्थिती सुधारली नाही, तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही, असा इशारा देणारा आहे. जगभरातील 50 देशांमधील दीडशे शास्त्रज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे.

पृथ्वीवर जैवविविधता कायम ठेवण्यास साह्यभूत ठेवणाऱ्या जीव आणि वनस्पती प्रजाती धोक्‍यात आल्या असून, काही प्रजाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढला आहे. सन 1992 मध्ये जैवविविधतेसंबंधी असाच एक अहवाल आला होता; परंतु त्या अहवालात वास्तवाच्या पुष्ट्यर्थ सखोल विश्‍लेषण फारसे नव्हते. आज एवढ्या वर्षांनंतर पुन्हा तयार करण्यात आलेल्या अहवालात मात्र सखोल विवेचन असून, वास्तव आणखी विस्तृत स्वरूपात मांडण्यात आले आहे. 2012 साली स्थापन करण्यात आलेली “आयपीबीईएस’ ही अशी संस्था आहे की, जिचे 132 देश सदस्य आहेत. “आयपीबीईएस’ने हा अहवाल तयार करण्यासाठी साडेतीनशेपेक्षा अधिक शास्त्रज्ञांची मदत घेतली आहे. दि. 29 एप्रिल ते 4 मे या कालावधीत झालेल्या शास्त्रज्ञांच्या बैठकीत या अहवालाचा केवळ एक भाग प्रकाशित करण्यात आला.

संपूर्ण अहवाल दीड हजार पानांचा आहे. या वर्षाच्या अखेरीस हा संपूर्ण अहवाल प्रकाशित केला जाणार आहे. पृथ्वीवरील जीवांच्या आणि वनस्पतींच्या सुमारे 10 लाख प्रजाती गंभीररीत्या धोक्‍यात आल्या आहेत, असे हा अहवाल सांगतो. पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल संपूर्ण जगभरात नेहमी चिंता व्यक्‍त केली जाते; मात्र तरीही या सजीवांवर असलेला धोका कमी झालेला नाही. सन 1980 पासून 2000 पर्यंतच्या कालावधीत म्हणजे अवघ्या 20 वर्षांत तब्बल 10 कोटी हेक्‍टरवरील नैसर्गिक जंगलांचा पूर्णपणे विनाश झाला. संपूर्ण पृथ्वीवरील जंगली प्रदेशांपैकी 75 टक्‍के प्रदेश आजही गंभीररीत्या संकटात आहे आणि त्याचा पूर्ण विनाश होण्याच्या मार्गात आपण कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. शास्त्रज्ञांचे मत विचारात घेतल्यास, जैवविविधतेवर घोंगावणाऱ्या धोक्‍याचा प्रश्‍न हा केवळ नामशेष होत असलेल्या प्रजातींना वाचविण्याचा प्रश्‍न नाही. ती अधिक विस्तृत समस्या आहे.

मानवी जीवन, आपली अर्थव्यवस्था, आपले अन्नधान्य उत्पादन, पिण्याचे पाणी या सर्व घटकांवर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, मानवी जीवन एका मोठ्या धोक्‍याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करीत आहे. या पृथ्वीवरील जीवन सुरक्षित राखणारा संपूर्ण आकृतिबंधच सध्या गंभीर धोक्‍यात आहे. भारताच्या 40 टक्‍के भूभागात यावर्षी तीव्र दुष्काळ पडला आहे, हे तर आपण पाहतोच आहोत. याचे कारण आपण कधी शोधले आहे? जैवविविधता धोक्‍यात येण्याची पाच मुख्य कारणे शास्त्रज्ञांनी सांगितली आहेत. सर्वांत धक्‍कादायक बाब म्हणजे, या कारणांमध्ये जलवायू परिवर्तन हे कारण अग्रस्थानी नाही. अर्थात, जेव्हा संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करण्याचा प्रश्‍न चर्चेला येतो तेव्हा जलवायू परिवर्तनाचाच मुद्दा प्रथम चर्चेत येतो. इतर बाबींकडे आपण लक्षही देत नाही. परंतु अहवाल सादर करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, जमीन आणि समुद्राच्या वापरातील मोठे फेरबदल. म्हणजेच, जमिनीवरील जंगले नष्ट करणे, जमिनीच्या पोटातील पाण्याचे बेसुमार दोहन करणे आणि विविध मार्गांनी समुद्राचे रूपांतर कचराकुंडीत करणे.

जैवविविधता धोक्‍यात येण्याचे दुसरे कारण म्हणजे, जगात जेवढ्या म्हणून सजीव प्रजाती आहेत, त्यांचे आपण आपल्या स्वार्थासाठी शोषण करीत आहोत. तिसरे कारण म्हणजे, जलवायू परिवर्तन. जलवायू परिवर्तनासंबंधी या अहवालात ब्रिटनचे शास्त्रज्ञ डॉ. वॉटसन यांनी म्हटले आहे की, आजमितीस पृथ्वीच्या सरासरी तापमानात केवळ दीड ते दोन अंशांनी वाढ झाल्यास किती भयावह दुष्परिणाम होईल, हे चिंतेचे कारण मानले जात आहे. मात्र, आपण ज्या वेगाने विविध हरितगृह वायूंचे उत्सर्जन करीत आहोत, त्या प्रमाणात विचार केल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान तब्बल साडेतीन अंशांनी वाढण्याची पुरेपूर शक्‍यता आहे. याचा अर्थ असा की, जैवविविधता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. समुद्रात प्रवाळाचे खडक असणे ही तर जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यावश्‍यक बाब आहे. तापमान वाढल्यास ते पूर्णपणे नष्ट होऊन जातील. चौथे कारण प्रदूषण असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले असून, पाचवे महत्त्वाचे कारण म्हणजे जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाइड (जनुकीय बदलांतून तयार केलेल्या) नव्या प्रजाती. हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा, आफ्रिकेतून माशाची एखादी प्रजाती भारतात आणली गेली, तर ती ज्या प्राण्यात सोडली जाईल, तिथे त्या प्रजातीची वसाहत तयार होईल आणि तीच प्रजाती त्या संपूर्ण जलाशयावर नियंत्रण प्रस्थापित करेल. त्या जलाशयात पूर्वीपासून असलेल्या सर्व जलचर प्रजाती नष्ट होऊन जातील. या सर्व कारणांमुळे जैवविविधतेवर मोठे संकट ओढावले आहे आणि लाखो प्रजाती धोक्‍यात आल्या आहेत. सुमारे 40 टक्‍के उभयचर प्रजाती धोक्‍यात आहेत.

समुद्रातील 33 टक्‍के प्रवाळांचे खडक तर यापूर्वीच नष्ट झाले आहेत. त्यामुळे सागरी जीवनात श्‍वास घेणाऱ्या सर्व सस्तन जीवांवर अस्तित्वाचे संकट आले आहे. कीटकांच्या किती प्रजाती धोक्‍यात आहेत, याविषयी अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. परंतु तरीही 10 टक्‍के कीटक प्रजाती धोक्‍यात आहेत, हे निश्‍चित. अशी प्रचंड मोठी आकडेवारी या अहवालात असून, ती थरकाप उडविणारी आहे. या धोक्‍यापासून पृथ्वीचे, पर्यायाने आपले रक्षण करायचे असेल, तर प्रत्येक देशातील सरकारने आपापल्या देशातील जैवविविधतेचा आढावा प्रामाणिकपणे घेणे आवश्‍यक आहे. जैवविविधतेतील बदलांचा मानवी जीवनावर काय परिणाम झाला आहे; होत आहे, याच्या नोंदींसह अहवाल तयार करायला हवा आणि त्याचा अभ्यास करूनच मोठे बदल घडवून आणणाऱ्या कृतियोजना तयार करायला हव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)