हिंजवडी पोलिसांनी केले राजस्थानी नागरिकाला अटक : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
पुणे – नातवास सांभाळण्यसाठी आणि घरकामासाठी सेविका देण्याच्या अमिषाने ज्येष्ठ नागरिकाला 26 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी राजस्थानी नागरिकाला अटक केली आहे. त्याला 13 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.मुजुमदार यांनी दिला आहे.
विक्रम सिंग अत्तर सिंग (वय 32, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ. राजस्थान) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत बावधन बुद्रुक येथे राहणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठाने फिर्याद दिली आहे. ही घटना 18 डिसेंबर 2018 रोजी घडली. फिर्यादी यांना घरकामासाठी सेविका हवी होती. त्यामुळे त्यांच्या मुलाने गुगलवरून ऑनलाईन माहिती घेऊन एका मोबाईल क्रमांकावर फोन केला. मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करून हडपसर येथील आयडीबीआय बॅंकेच्या खात्यात 26 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार रक्कम भरण्यात आली. मात्र, सेविका मिळाली नाही.
भरलेली रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सिंग याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड करत आहेत.