दोन लहानग्यांना विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

पतीबरोबर घरगुती वादातून केला प्रकार

पुणे – पती बरोबर घरगुती वाद झाल्याने एका महिलेने दोन लहानग्यांना दुधातून विष पाजून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी नऱ्हे येथे घडली. महिला व तीच्या दोन्ही मुलांचा उपचारानंतर धोका कमी झाला आहे.
याप्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका 27 वर्षीय महिलेविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेसह तीची मुलगी प्रांजली(5 ) व मुलगा आदित्य(4) या तीघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जीवन मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी महिला व तीचा पती दोघेही मजुरी काम करतात. त्यांना प्रांजली व आदित्य ही दोन मुले आहेत. महिलेचे पतीबरोबर घरगुती वादातून भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून तीने पती कामावर गेल्यावर किटकनाशक घरातील गायीच्या दुधात मिक्‍स केले. हे दुध तीने दोन्ही मुलांना वाटीने पाजल्यावर स्वत: ही पिले. यानंतर तीघांनाही उलट्या व त्रास होऊ लागला. शेजारच्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. यातील आदित्यची तब्बेत गंभीर होती. उपचारानंतर तीघांच्याही जीवाचा धोका टळला.

स्वत:च्या व दोन्ही मुलांच्या जीवास धोका निर्माण केल्याप्रकरणी तीच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.डी.पाटील करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here