पुणे – शाळेला जाणारी अल्पवयीन मुलगी आणि घरात घुसून तिच्या आईचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
आकाश चंदु शेट्टी (वय 20, रा. कोंढवा खुर्द) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 35 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 18 डिसेंबर 2016 रोजी आणि त्यापूर्वीच्या सहा ते सात महिन्याच्या कालावधीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी आणि त्यांच्या पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.
कोंढवा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती मोरे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार संतोष आंगणे आणि पोलीस शिपाई अंकुश केंगले यांनी मदत केली. घटनेपूर्वी सहा ते सात महिन्याच्या कालावधीत फिर्यादींच्या 14 वर्षीय मुलीचा शाळेत जाताना आकाश पाठलाग करायचा. तिला पाहून अश्लील हावभाव करत असत. तिच्याकडून फिर्यादी म्हणजे आई आणि वडिलांचा मोबाइल क्रमांक घेतला होता. फिर्यादींना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादींने याबाबत तक्रार नोंदविली नाही.
त्यानंतर त्याने 17 डिसेंबर 2016 रोजी रात्री 11 वाजता घरात घुसून अल्पवयीन मुलीला पळवून नेणार असल्याचे सांगितले. तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्री 11.30 वाजता घरात घुसून धमकावून फिर्यादींचा विनयभंग केला. त्यावेळी घरातील मुलींना आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोक जमले. हे पाहून तो पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद कलम आठ, विनयभंग, बेकायदेशीरपणे घरात घुसणे आणि धमकाविणे या कलमानुसार शिक्षा सुनावली.