पुणे – हात उसने घेतलेले आणि दुकानातून नेलेल्या मालाचे लाखो रुपये न देता व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दांपत्याला 1 वर्षे 8 महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तर, दंड भरल्यास 8 हजार रुपये फिर्यादींना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहेत.
किशोर शिवसागर चौहान (वय 37) आणि त्याची पत्नी लीला (वय 35, दोघेही, रा. सुखसागरनगर, कात्रज) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 22 मार्च 2010 ते 22 जुलै 2012 या कालावधीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी पोलीस हवालदार संजय पुणेकर, कर्मचारी उमेश दाभेकर आणि विष्णू पाटोळे यांनी मदत केली.
फिर्यादी यांचे शनिवार चौक येथे पल्लवी साडी सेंटर आणि सोनी फॅशन फुटवेअर नावाचे होलसेल आणि किरकोळ विक्रीचे दुकान होते. किशोर याचे तुळशीबाग येथे कपडे आणि शुज विक्रीचे दुकान होते. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. किशोर वेळोवेळी फिर्यादींच्या दुकनातून उधार माल नेत असत. त्याचे पैसेही तो वेळेवर द्यायचा. त्यानंतर फिर्यादींकडून त्याने 3 लाख 71 हजार रुपये हातउसने घेतले होते. तर, दुकानातील 10 लाख रुपये किंमतीचे रेडिमेड कपडे आणि 6 लाख रुपयांचे शुज, चप्पल घेतले होते. त्यापोटी फिर्यादींना 1 लाख रुपये रोख दिले होते.
तर, हातउसने घेतलेले पैसे आणि उधारीच्या पैशासठी चार लाखाचे पाच असे एकुण वीस लाख रुपयांचे धनादेश दिले होते. मात्र, हे सर्व धनादेश बाऊन्स झाले. त्यानंतर फिर्यादींनी मागूनही त्यांना पैसे परत देण्यात आले नाहीत. बिबवेवाडी पोलिसांनी याबाबत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.