संगणक अभियंत्याचा खून; जाब विचारणे जिवावर बेतले

तीन आरोपींना अटक 

पिंपरी – थोबाडीत मारल्याचा जाब विचारणे एका संगणक अभियंत्याच्या जीवावर बेतले. संगणक अभियंत्यावर आरोपीने धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केला. डिलक्‍स चौक, पिंपरी येथे गुरुवारी (दि.14) मध्यरात्री वार झालेल्या संगणक अभियंत्याचा शनिवारी पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तीन जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

मंजीत मोतीलाल प्रसाद (वय-22, रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मोहन संभाजी देवकाते (रा. खराडी रोड, चंदननगर, पुणे) यांनी फिर्याद दिली. धर्मेश श्‍यामकांत पाटील, यशवंत ऊर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय-20, दोघेही, रा. मिलिंदनगर, पिंपरी) आणि स्वप्निल संजय कांबळे (वय-25, रा. मोनिका अपार्टमेंट जवळ, पिंपरीगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, इतर दोन साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजीत हे विमाननगर येथील डब्ल्यूएनएस या कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला होते. तर फिर्यादी देवकाते हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरी सोडवण्यासाठी चालले होते.

गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ते पिंपरीतील डिलक्‍स चौकात आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढे दुचाकी लावत टेम्पो चालकाला गाडी उभी करण्यास भाग पाडले. तसेच कट का मारला असे विचारत टेम्पो चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी टेम्पोत चालकाशेजारी बसलेले मंजीत यांनी क्‍यों, क्‍या हुआ अशी विचारणा शिवीगाळ करणाऱ्या दुचाकीवरील तरुणांना केली. त्यापैकी एकाने खिडकीतून हात घालत मंजित यांच्या थोबाडीत मारली.

थोबाडीत का मारली? असे विचारण्यासाठी मंजीत खाली उतरले. त्या वेळी पाच जणांनी त्यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. मंजीतावर चॉपरने वार केले. यात मंजीत गंभीर जखमी झाले. यावेळी बसमधील मंजीत यांचे सर्व सहकारी धावून आले असता आरोपी तेथून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या मंजीतचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)