कामशेत : शरीरसंबंधाच्या अमिषाने व्यापाऱ्याचे अपहरण

ऑनलाइन पैसे उकळले : बेदम मारहाण करीत 25 लाखांची केली “डिमांड’

कामशेत – महिन्याभरापासून मोबाईलवरून गोड बोलून शरीरसंबंधासाठी “गळ’ टाकणाऱ्या महिलेने सहा-सात जणांच्या मदतीने एका व्यापाऱ्याचे अपहरण केले. मोटारीत घालून अज्ञातस्थळी नेले, तिथे विवस्त्र करीत बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे 25 लाखांची मागणी केली. त्याचवेळी मोबाईलमधील “ऑनलाइन बॅंकिंग ऍप’च्या माध्यमातून 96 हजार रुपये उखळले. खंडणीची उर्वरित रक्‍कम 6 एप्रिलपर्यंत न दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत येथील एका 25 वर्षीय कापड व्यापाऱ्याला महिन्यापासून एका अज्ञात महिला वारंवार मोबाईलवरून संपर्क साधत होती. सततच्या संपर्कातून व्यापारी आणि संबंधित महिला यांच्यातील बोलणे अधिक वाढले. महिलेने व्यापाऱ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यानुसार दोघेही शुक्रवारी (दि. 29) दुपारी बाराच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथे भेटले. पहिल्या भेटीतच महिलेने व्यापाऱ्याकडे शरीर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवला. महिलेच्या प्रस्तावाला नकार न देता व्यापारी आणि महिला जांभूळफाटा येथील एका हॉटेलवर गेले.

मात्र काही वेळातच महिलेने कामाचा बहाणा केला. परत भेटण्याच्या अटीवर व्यापारी आणि महिला हॉटेलमधून बाहेर पडले, मात्र बाहेर येताच व्यापाऱ्याला सहा-सात जणांनी घेरले. मोटारीत घालून त्याचे अपहरण केले. मोटारीत बेदम मारहाण करीत पवनानगर येथील पौड रस्त्याने अज्ञातस्थळी नेले. पडक्‍या घरात व्यापाऱ्याला विवस्त्र करून बेदम मारहाण केली.

व्यापाऱ्याला मारहाण करीत असताना ज्या महिलेसोबत हॉटेलमध्ये गेला, त्या महिलेच्या दीराला सर्व प्रकार सांगितला आहे, असे मारहाण करणारे बोलत होते. याशिवाय महिलेच्या लग्नासाठी 15 लाख रुपये खर्च केले आहेत, तू आम्हाला 25 लाख रुपये दे, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा बेदम मारहाण केली. त्याचवेळी व्यापाऱ्याकडील 1500 रुपये, महागडा मोबाईलही हिसकावून घेतला. व्यापाऱ्याला धमकावत त्याच्या मोबाईलमधील “ऑनलाईन बॅंकिंग ऍप’च्या साह्याने सुमारे 96 हजार रुपये महिलेच्या खात्यावर पैसे “ट्रान्स्फर’ केले. तसेच “पंचवीस लाखांतील उर्वरित रक्‍कम 6 एप्रिलपर्यंत दे, अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबियांना जीवे मारू अशी धमकी दिली.

दरम्यान, सायंकाळी करुंज येथील एका व्यक्‍तीस बोलावत व्यापाऱ्याला त्याच्याकडे सोपविले. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या त्या व्यक्‍तीने व्यापाऱ्याला कामशेतमध्ये दुचाकीवर सोडले. जखमी व्यापारी थेट रुग्णालयात गाठले. डॉक्‍टरांनी त्याचे समुपदेशन करीत रात्री उशिरा पोलिसांना कळवले. त्यामुळे सगळा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्याने कामशेत पोलीस ठाण्यात एका अज्ञात महिलेसह अज्ञात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.

“कामशेत येथील व्यापाऱ्याने एका सराईत टोळीकडून अपहरण झाले होते. मात्र बदनामी होईल, या भीतीने प्रथम व्यापारी काही बोलला नाही, डॉक्‍टरांच्या मदतीने व्यापाऱ्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्याद दाखल केली. तपास युद्धपातळीवर सुरू आहे. काही तांत्रिक अडचणीनंतर लवकरच आरोपीपर्यंत आमची टीम पोहोचेल. हा प्रकार ओळखीतून झाला आहे. घटनेस स्थानिक कनेक्‍शन असल्याची शक्‍यता आहे.
– निलकंठ जगताप, सहायक पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस ठाणे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)