पिंपरी – कासारवाडी येथून एका महिलेकडून पोलिसांनी तब्बल 36 लाख रुपयांची ब्राऊन शुगर जप्त केली आहे. ही कारवाई पोलिसांनी नाशिकफाटा येथे केली. ब्राऊन शुगरच्या वाहतुकीसाठी महिलांचा वापर होत असल्याने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी फिर्याद दिली असून कलराणी पेरीसामी देवेंद्र (वय-52 ) या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. ती मूळची तामिळनाडू येथील असून मुंबई मधील सायन कोळीवाडा येथे राहण्यास आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पथकातील पोलीस कर्मचारी हे गस्त घालत असताना शहराच्या कासारवाडी, नाशिक फाटा येथे 52 वर्षीय महिला ही संशयितरित्या थांबली असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, दोन्ही पथकाने जाऊन कलाराणी पेरिसामी देवेंद्र या महिलेकडे चौकशी केली मात्र तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने तिची तपासणी केली असता तिच्याकडे 300 ग्रॅम ब्राऊन शुगर मिळाली. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठे 36 लाख रुपये किंमत आहे. ब्राऊन शुगर ही परराज्यातून आणली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत आणि श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपरिक्षक वसंत मुळे, पुरुषोत्तम चाटे यांच्या पथकाने केली. कलराणी ही मुंबईवरुन ही ब्राऊन शुगर घेऊन पिंपरी-चिंचवड येथे आली होती, त्यामुळे या महिलेच्या पाठीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.