सासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

पुणे – पत्नीस नांदण्यास पाठवावे, यासाठी घरात घुसून दोन मेहुण्यांवर आणि मासे विक्रीच्या दुकानात जावून सासऱ्यांवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांनी हा आदेश दिला आहे.

अतुल तानाजी वाबळे (वय 28, रा. मांजरी बुद्रुक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत मेहुणा हिरामण रमेश चव्हाण (वय 33, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 जून 2012 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास फिर्यादींच्या घरात घडली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी 10 साक्षीदार तपासले. त्यामध्ये तीन्ही जखमींची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला.

सासरची मंडळी माहेरून पैसे आणावे, यासाठी त्रास देत असल्याने फिर्यादींची बहिण सुवर्णा माहेरीच होती. घटनेच्या दिवशी तो फिर्यादींच्या घरी गेला. सुवर्णा यांच्या गळ्याला कोयता लावला. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या भाऊ सुभाष यांनी बहिणीला सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी त्या दोघांवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी 7.15 च्या सुमारास सासरा रमेश यांना मंडई येथील मासे विक्रीच्या दुकानात जावून कोयता फेकून मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी सुरूवातीला भारतीय दंड संहिता कलम 307 (खूनाचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने भादवी कलम 324 (गंभीर दुखापत करणे) आणि भादवी कलम 452 (बेकायदेशीरपणे घुसात घुसणे) नुसार शिक्षा सुनावली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)