पिंपरी : नाकाबंदीमध्ये पाच दरोडेखोर शस्त्रासह अटक

दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस जप्त

पिंपरी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या नाकाबंदीमध्ये पाच दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. बुधवारी (दि. 27) रात्री दिघीतील मॅग्झिन चौकात ही कारवाई केली.

केशव लक्ष्मण सूर्यवंशी (वय-24), भागवत लिंबाजी कुंभारे (वय-19, दोघेही रा. खंडोबा माळ, नारायणनगर, फुरसुंगी), मनोज आत्माराम थिटे (वय-28, रा. गंगा पेट्रोल पंपामागे, हडपसर), रणजीत शरदचंद्र लोखंडे (वय-24, रा. दत्त मंदिराजवळ, हडपसर, पुणे), अशोक सीताराम चव्हाण (वय-27, रा. करंजेपेठ, सातारा) अशी नाकाबंदी दरम्यान अडकलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आनंद गौतम कापुरे (वय-31) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दिघीतील मॅग्झिन चौकात नाकाबंदी दरम्यान पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, त्याठिकाणी आलेल्या आरोपींच्या मोटारीचा पोलिसांना संशय आला. त्यांनी मोटारीची तपासणी केली असता आरोपींकडून दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, नायलॉन दोरी, मिरची पूड, लोखंडी रॉड, एक सुरी व दोन लाकडी दांडके मिळून आले. पुढील तपास दिघी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)