पिंपरीतील एच. ए. मैदानावरील धक्कादायक प्रकार
पिंपरी – पिंपरी येथे तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करत मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 21) सकाळी पिंपरी येथील एच. ए. मैदानावर घडला आहे. अजय राजेश नागोसे (वय-19, रा. गांधीनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
स्थानिक नागरिकांनी नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानुसार पिंपरी पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. यावेळी मृतदेहातून धूर निघत होता. पोलिसांनी पाणी ओतून ती आग विझवली. सुरुवातीला मुलगी असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. मात्र मृतदेहाचे निरीक्षण केले असता तो तरुण असल्याचे समोर आले.
एच. ए. ठरतेय डोकेदुखी
शहराच्या मध्यवर्ती भागात सुमारे 80 एकर एवढे मोठे हे मैदान आहे. याच मैदानावर आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर सप्टेंबर महिन्यातच एका सात वर्षाच्या चिमुकलीला मारून फेकून देण्यात आले होते. त्या खुनाचा उलगडा अद्यापही झालेला नाही. यापूर्वीही येथे खून, मारामारी, गोळीबार असे प्रकार घडले आहेत. शहराची मध्यवर्ती असणारे एच. ए. मैदान हे आता अतिक्रमण, अवैध धंदे, गुन्हे यामुळे ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणी अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जाते. तसेच परिसरात रोडारोडा टाकण्याचेही प्रमाण जास्त असल्याने येथे खून करुन मृतदेह तेथे टाकून जाणे आरोपींनाही सोपे झाले आहे.
पोलिसांना घटना स्थळावरून मिळालेल्या साहित्यावरून तरुणाची ओळख पटली. अजय हा एच. ए. कंपनी येथील कॅन्टीनमध्ये कामाला होता. तो शनिवारी (दि. 20) दुपारी कामावर गेला होता. त्याचे कोणाशी भांडण होते का, की काही इतर कारण या खूनामागे होते याचा पिंपरी पोलीस तपास करीत आहे. विशेष म्हणजे अजय याच्या छोट्या बहिणीचेही आजारपणाने दीड ते दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. दोन महिन्यातली दुसरी घटना असल्याने नागोसे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खून प्रकरणांचा आढावा घेतला असता 2018 या वर्षात शहरात एकूण 72 म्हणजे महिन्याला सहा खून झाले आहेत. यामध्ये परिमंडळ एकमध्ये 39 खून झाले असून त्यातील 33 खून उघड झाले आहेत. तर परिमंडळ दोनमध्ये वर्षभरात 33 खून झाले असून त्यातील 30 खून उघड झाले आहेत. यातील सर्वात जास्त खुनाचे गुन्हे हे चाकण पोलीस ठाणे येथे दाखल असून त्यांची संख्या ही 15 एवढी आहे. यातील केवळ 9 खुनांचा छडा आत्तापर्यंत पोलिसांनी लावला आहे.