पुणे – महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्विगी डिलिव्हरी बॉयचे एक संतापजनक कृत्य समोर आले आहे. डिलिव्हरी देण्यास आलेल्या स्विगी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केला आहे. संबंधीत तरुणीसमोर तो पॅन्टचे बटण आणि चेन खोलून उभा राहिला. यानंतर त्याने एक घाणेरडे कृत्य केले. संबंधीत पिडीत तरुणीने स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरला तक्रार करुनही दखल घेतली न गेल्याने अखेर डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी डेक्कन परिसरात रहाणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पिडीत तरुणी विधी शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेते. तीने ऑन लाईन पध्दतीने स्विगी कंपनीच्या वेबसाईटवरुन खाद्य पदार्थ मागवले होते. डिलिव्हरी बॉय रात्री दहाच्या सुमारास ऑर्डर घेऊन आला. ऑर्डर दिल्यानंतर त्याने पिडीत तरुणीला पाणी मागितले. पिडीत तरुणी पाणी घेऊन आली असता तीला मोठा धक्का बसला. डिलिव्हरी बॉय पॅन्टचे बटण आणी चेन खोलून समोर उभा होता. यानंतर त्याने घाणेरडे कृत्य करत पिडीतेचा विनयभंग केला. घाबरेलल्या तरुणीने तातडीने दरवाजा लावून घरात धाव घेतली.
यानंतर तीने स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी कंपनीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. यामुळे पिडीत तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक भागवत करत आहेत.