पिंपरी – सिगारेटचे पैसे मागितले म्हणून पान टपरी चालकावर तिघांनी कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि.2) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचवड येथील ईगल हॉटेल समोर घडली. साबिर अब्बास सय्यद (वय 20, रा. लालटोपीनगर, मोरवाडी कोर्टच्या मागे, पिंपरी) असे जखमी झालेल्या टपरीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, करण पवार (रा. पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी आरोपी करण आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार साबिर यांच्या पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी आले होते. साबिरने त्यांना सिगारेट दिली मात्र आरोपींनी त्यांना सिगारेटचे पैसे दिले नाही. यामुळे साबीरने त्यांच्याजवळ पैशांची मागणी केली. यावर आरोपींनी साबीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या हातावर कोयत्याने वार केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले. चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.