पिंपरी – पूर्वी झालेल्या भांडणाची पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून सहा जणांनी मिळून कारची तोडफोड केली. ही घटना 3 जून रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे येथील राधा चौकात घडली. हितेश हिरभाऊ नेटके (वय-29 रा. साई चौक, पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन अजय निम्हण, आकाश आगवणे, विकास निम्हण, वैभव दळवी, विशाल निम्हण, राजू कांबळे (सर्व रा. निम्हण मळा, पाषाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेश हे मित्रांसोबत म्हाळुंगे येथील राधा चौकात गप्पा मारत असताना आकाश आगवणे याने बेकायदा जमाव जमवून हातात तलवार, दगड, लाकडी दंडुके घेवून फिर्यादीच्या कारवर मारून कारच्या पुढची व मागची काच फोडून नुकसान केले. पूर्वीपण फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला होता, याबाबतची तक्रार फिर्यादी यांनी पोलिसांकडे केली होती. याच रागातून आरोपीने कारची तोडफोड केली.