पिंपरी – सोसायटीमध्ये भाड्याने राहणाऱ्या आयटी अभियंत्याला चौघांनी सोसायटीच्या कार्यालयात डांबून ठेऊन 4 लाख 70 हजार रुपये लुटल्याची खळबळजनक घटना हिंजवडी येथे घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील ब्ल्यूरिच सोसायटीमध्ये घडली. आरोपींनी आयटी अभियंत्याच्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड मधून पैसे ट्रान्सफर करुन तसेच त्याच्या जवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाख 70 हजार रुपयाचा ऐवज लुटला आहे.
संदीप नरसिंहराव तल्लुरी (वय-32 रा. हिंजवडी) या आयटी अभियंत्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अंगज (वय-35), रिझवान (वय-35),शागुत्ता अब्दुल करीम (वय-26), एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप हे हिंजवडी येथील ब्ल्युरीच सोसायटीमध्ये भाड्याने राहतात. त्यांचे काही सामान सोसायटीच्या कार्यालयात राहिले होते. रविवारी ते राहिलेले सामान घेण्यासाठी सोसायटीच्या रुममध्ये गेले असता कार्यालयात असलेल्या चारही आरोपींनी संदीप यांना कार्यालयात डांबून ठेवले.
त्यांच्या ऍक्सिस बॅंकेच्या डेबिट कार्डमधून 90 हजार,आयसीआयसीआयच्या डेबिट कार्डमधून 1 लाख, आयसीआयसीआयच्या क्रेडिट कार्डमधून 1 लाख 90 हजार रुपये व 45 हजारांची सोन्याची चैन, 40 हजारांची सोन्याची अंगठी व खिशातील रोख 5 हजार रुपये असा एकूण 4 लाख 70 हजार रुपयाचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.