पोलिसांच्या सोंगापुढे अट्टल गुन्हेगारांचे पितळ उघडे

स्वस्तात सोन्याचे अमिषाने लुटणारे तिघे अट्टल गुन्हेगार जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची नेवाशात कामगिरी

नगर  – अट्टल गुन्हेगाराच्या शोधात पोलीस सोंगाडे झाले. हे सोंग पोहचले नेवासे तालुक्‍यातील घोडेगांव ते सोनई परिसरात. सोंगाड्याच्या पुढ्यात आले कळशी भरून सोने. सोन्याच्या अंगठ्यांनी भरलेली कळशी समोर येताच, सोंगाड्याने केला इशारा. क्षणात, कळशीभर सोने घेऊन आलेल्यांना पडल्या बेड्या. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची ही कारवाई सिनेमातील एखाद्या दृश्‍याला लाजवेल, अशीच आहे.

-Ads-

सोन्याचे दागिने स्वस्तात देतो, असे अमिष दाखवून लुट करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्‍या पोलिसांनी आज आवळल्या. केदार प्रल्हाद मोहिते (वय 36, रा. चाळीसगांव, जि. जळगांव, हल्ली रा. कळवण, जि. नाशिक), गौतम हिरामण काळे (वय 25, रा. पाणसवाडी, ता. नेवासे) व त्याचा जावई अजबे महादू भोसले (वय 22, रा. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

गौतम काळे विरोधात 16 गुन्हे

गौतम काळे हा अट्टल गुन्हेगार आहे. औरंगाबाद जिल्हा पोलीस दलाने त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यातील बहुतांशी गुन्हे दरोडा आणि लुटीचे आहेत. देहूरोड (जि. पुणे), शनिशिंगणापूर, नेवासे व गंगापूर (औरंगाबाद) येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोनई पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल आहेत.

गोविंद रुजे (रा. पुणे) यांची तोंड ओळख असलेल्या व्यक्तीने खोदकाम करत असताना एक किलो सोने सापडले आहे. ते स्वस्तात विकत देतो असे सांगून नेवासे परिसरात त्यांची पाच लाख रुपयांची लूट केली. सोनई पोलीस ठाण्यात याप्रकरणी 9 ऑक्‍टोबरला गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याची समांतर तपास सुरू ठेवला. या गुन्ह्यात जळगाव येथील केदार प्रल्हाद मोहिते हे गुन्हेगार असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. केदार मोहिते याने ही लूट गौतम हिरामण काळे व त्याचा जावई अजबे महादू भोसले याच्या मदतीने केल्याची माहिती दिली. गोतम काळे याची पार्श्‍वभूमीची चौकशी केल्यावर त्याच्यावर दरोड्याचे, लुटीच्या गुन्ह्याची माहिती मिळाली. औरंगाबाद जिल्हा पोलिसांनी त्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तेथूनही तो पसार होता. गौतम काळे याच्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यासाठी बनावट गिऱ्हाईकाचे सोंग रचले. तशी हे सोंग पोलिसांच्या जीवाशी येणारे होते.

दिलीप पवार यांनी गिऱ्हाईक म्हणून पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले यांना बरोबर घेतले. व्यवहार करण्याचे ठिकाण घोडेगांव-सोनई रोडवरील मुळाडॅम पाटाच्या कडेला ठरले. या ठिकाणच्या परिसरातील शेतात दुसरी एक टिम पेरून ठेवली. त्यात सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे भागीनाथ पंचमुख, दिनेश मोर, विजय ठोंबरे, रवीकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, योगेश सातपुते, रोहिदास नवघिरे, सचिन कोळेकर यांचा समावेश होता. ही टिम येथील शेतात दबा धरून बसली. गौतम काळे हा तिथे आला.

त्याच्याबरोबर आणखी एक साथीदार होता. त्याच्या हातात स्टीलची कळशी होती. त्यात सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्या पिवळ्या धातुच्या होत्या. बनावट होत्या. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी व्यवहार सुरू केला. गौतम काळे व त्याचा साथीदार त्याला भुरळ पडली. दिलीप पवार यांच्या हे लक्षात येताच त्यांनी सापळा आवळला. शेतात लपलेल्या पोलिसांनी या दोघांवर क्षण न घालविता ताब्यात घेतले. बनावट पिवळ्या धातुच्या अंगठ्या असलेली कळशी पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांची ही कामगिरी म्हणजे, एखाद्या सिनेमातील दृश्‍याप्रमाणे यशस्वी झाली. यात थोडे जरी नियोजन फिस्कटले असते, तर गिऱ्हाईक म्हणून गेलेले पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याह तीन पोलीस कर्मचारी संकटात सापडले असते.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
4 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)