पिंपरी – एका 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमाचे नाटक करुन तिच्या संमतीशिवाय आपत्तीजनक फोटो व व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना 2016 ते मे 2019 या कालावधीत चिखली आणि आकुर्डी या परिसरात घडली.
या प्रकरणी पीडित 19 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी कुलदीप सुभाष धुमाळ (वय ,28 रा. ओमसाई सोसायटी, एफ,7 फ्लॅट नं. 403 घरकुल, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.
2016 ते मे 2019 या कालावधीत आरोपी कुलदीप याने तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले. तसेच, तिच्यासोबतच्या खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये चोरुन काढले. त्यानंतर व्हिडिओ तरुणीच्या मोबाईलवर पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पुन्हा शरीरसंबंधांची मागणी केली व तरुणीच्या आई-वडीलांनाही मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी कुलदीप याला अटक केली आहे.