मनोरुग्ण मुलाकडून आईचा खून

पिंपरी – गळ्यामध्ये कात्री खुपसून 40 वर्षीय मनोरुग्ण मुलाने वृद्ध आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी(दि.28) दुपारी साडे तीनच्या सुमारास चिंचवड येथे घडला.

सुमन विजय सावंत (वय-60, रा. गुरुद्वारा रोड, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी भूपेंद्र विजय सावंत ( वय-40) याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मनोरुग्ण असल्याने भुपेंद्र काहीही काम करत नव्हता. त्याच्या लग्नासाठी आणि अन्य कारणांमुळे आई आणि मुलामध्ये वारंवार वाद होत होते. भूपेंद्र याने मागील दोन महिन्यांपूर्वी सुमन यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्याबाबत सुमन यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता.

एक वर्षांत पाच वेळा प्राणघातक हल्ले

भूपेंद्र याने 2018 साली याच दिवशी म्हणजे 28 एप्रिल रोजी आईवर प्राणघातक हल्ला करत तिच्या डोळ्यात चाकू खुपसला होता. बरोबर रविवारी 28 एप्रिल रोजीच त्याने आईच्या गळ्यात कात्री खुपसून तिचा खून केला. 2018च्या हल्ल्यानंतर भूपेंद्र याने चारवेळा आईवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे सुमन यांनी येरवडा मनोरुग्णालयाला पत्र पाठवून सांगितले होते की भूपेंद्रपासून माझ्या जिवाला धोका आहे. पतीच्या मृत्यूनंतर घरात एकटेच राहत असल्याने व मुलावरील प्रेमापोटी सुमन यांनीच भूपेंद्रला रुग्णालयातून माघारी आणले होते. मात्र वारं-वार हल्ले करत असल्याने त्यांनी मनोरुग्णालयाला पत्र पाठवले होते. पाच वेळा सुदैवाने सुमन यांचे प्राण वाचले होते, परंतु अखेर पोटच्या मुलानेच त्यांचे आयुष्य निघृणपणे संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)