पिंपरी – भोसरी पोलिसांनी फुगेवाडी येथून 13 हजार रुपयांचे मद्य जप्त केले असून एका आरोपीला याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.8) मध्यरात्री करण्यात आली. योगेश बापू आयाळी (वय-21 रा. फुगेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगेवाडी येथील पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी वाईन, तसेच बीयरची बेकायदेशीर विक्री सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात छापा मारला असताना तेथून 13 हजार 240 रुपयांचे मद्य जप्त केले आहे. विनापरवाना दारु विक्री केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. निवडणूक काळात बेकादेशीर रित्या होणाऱ्या दारु विक्रीवर सध्या पोलिसांची व राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून त्यानुसार छापे टाकत शहर परिसरात कारवाई केली जात आहे.