पुणे – कॅबचालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून अपहरण केल्यानंतर त्याची कॅब घेऊन पलायण करण्यात आले. त्याला स्वारगेटपासून यवतपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून शेतात टाकण्यात आले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कॅबचालक प्रमोद पाटोळे (वय 31 रा. ताथवडे) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोळे हे ओला कंपनीसाठी कॅब चालवितात. शुक्रवारी रात्री त्यांनी शेवटी धानोरी ते स्वारगेट असे भाडे घेतले होते. रात्री 11.15 वा. सुमारास त्यांनी प्रवाशाला स्वारगेट परिसरात सोडले. त्यानंतर परत जाण्यासाठी प्रवासी मिळण्याची वाट पाहत ते एसटी स्थानकासमोर उभे होते. यावेळी चार व्यक्ती त्यांच्या जवळ आल्या. त्यापैकी एका व्यक्तीकडे पिस्तूल होते. त्याने पाटोळे यांच्या डोक्याला पिस्तूल लावले व इतरांनीही त्यांना धक्काबुक्की करत गाडीत कोंबले.
यानंतर लक्ष्मीनारायण चौक ते कदमवाकवस्ती येथे गेले. तेथे दोन साथीदारांना घेऊन यवत परिसरातील एका शेतात त्यांनी कार थांबविण्यास सांगितली. त्यानंतर पाटोळे यांचे हातपाय बांधून त्यांना शेतात टाकून दिले. त्यांची 5 लाख रुपये किंमतीची कार जबरदस्तीने चोरून नेली. कारमध्ये रोख 2 हजार 200 आणि मोबाईल होता. यवत परिसरातील शेतात सकाळपर्यंत पाटोळे पडून होते. जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाहिले आणि त्यांची सुटका केली. त्यानंतर ते सकाळी स्वारगेट पोलिस ठाण्यात आले. त्यांनी घटनेची तक्रार दिली.