विश्‍वचषकासाठीचा संघ तयार – विराट कोहली

एका स्थानासाठी पर्याय शोधने आवश्‍यक

नवी दिल्ली – विश्‍वचषका पुर्वीची अखेरची मालिका भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3-2 अशा फरकाने गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील खराब कामगिरीचे खापर कोणत्याही एका खेळाडू अथवा खेळपट्टीवर न फोडता या मालिकेत विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पात्र होता असे विधान केले असून या मालिकेनंतर विश्‍वचषकासाठीच्या संघात कोणताही संभ्रम नसून केवळ एका स्थानावरील फलंदाजाचा पर्याय शोधने आवश्‍यक असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 3-2 असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विराटने विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक केले. असून यावेळी तो म्हणाला की, ऑस्ट्रेलिया संघ या विजयासाठी पात्र होता. त्यांनी संपुर्ण मालिकेत चांगली कामगिरी नोंदवली. यावेळी त्यांच्या संघातील उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्‍सवेल, ऍश्‍टॉन टर्नर आणि पिटर हॅण्डस्कोम्ब या खेळाडूंची देखील त्याने स्तुती केली.

यावेळी त्याने विश्‍वचषकामधील संघाबाबतही त्याने भाष्य केले. विश्‍वचषकासाठी भारतीय संघात कोणाला स्थान द्यायचे, याबाबत सध्या संभ्रम नाही. आम्हाला नेमके काय करायचे आहे, याची कल्पना आम्हाला आहे, असे त्याने सांगितले. मात्र, यावेळी एका क्रमांकावरील खेळाडू हे सातत्याने अपयशी ठरत असून त्या क्रमांकावरील खेळाडूंच्या निवडी बाबद अद्यापही चाचपणी सुरू असून आगामी काळात त्यात काही बदल देखील होवू शकतात असेही त्याने यावेळी सुचवले आहे.

मालिकेत रोहित शर्मा, शिखर धवन या सलामीवीरांसह केदार जाधव आणि विराट कोहली हे पाचही सामने खेळले. विजय शंकरलाही पाचही सामन्यात संधी मिळाली. पण लोकेश राहुलला फक्त एका सामन्यात तर ऋषभ पंतला दोन आणि अंबाती रायडूला तीन सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. याबाबत कोहली म्हणतो, काही खेळाडूंना जास्त सामन्यात खेळवता आले नाही, ही आमच्यासाठी चिंतेची बाब नाही. आम्हाला संघनिवडीबाबत संभ्रम नाही. आता आम्हाला संघातील 11 पैकी एका जागेबाबत निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक खेळाडूकडे जबाबदारी सोपवून मैदानात तो दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आम्ही बदल केले. मालिकेत संधी न मिळालेल्यांना मैदानात पाठवून ते कोणत्या परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे आम्हाला बघायचे होते, असे त्याने सांगितले. तुर्तास विश्‍वचषक स्पर्धेमध्ये सर्वच संघांना समान संधी असल्याचे वाटते, असेही कोहलीने यावेळी सांगितले. त्याच बरोबर वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे सध्याच्या कामगिरीवरुन विश्‍वचषक जिंकण्यासाठी जास्त पात्र असल्याचे दिसत आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघ देखील संतुलित दिसतोय. पाकिस्तानचा संघ सामन्याच्या दिवशी कोणाचाही पराभव करु शकतो. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेत तुम्ही कोणत्या मानसिकतेने जात आहात, हे महत्त्वाचे ठरते, असे त्याने सांगितले.

चार वर्षांपासून चौथ्या स्थानासाठी प्रयोग सुरू

विश्‍वचषकाला आता केवळ अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र तरीही चौथ्या स्थाना वरील आदर्श फलंदाजाचा शोध कायम असून गेल्या चार वर्षांत या जागेसाठी सातत्याने प्रयोग झाले. तब्बल 11 फलंदाजांना या स्थानासाठी अजमावून पहाण्यात आले असून एकही फलंदाज या स्थानासाठी योग्य असल्याचे सापडले नाही. मात्र, या स्थानावर कर्णधार विराट कोहलीच्या मते अंबाती रायडूहा योग्य फलंदाज असून उप-कर्णधार रोहित शर्माच्या मते महेंद्रसिंग धोनीया क्रमांकासाठी आदर्श फलंदाज आहे.

2015 पासून चौथ्या स्थानावर सर्वाधिक 14 वेळा अंबाती रायुडूला संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी रायुडूचे चौथे स्थान नक्की मानले जात होते, मात्र, पहिल्या तीन सामन्यात त्याने केवळ 33 धावा काढल्याने संघ व्यवस्थापनाने अखेरच्या दोन लढतीत पुन्हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहली स्वत: चौथ्या स्थानी खेळला. त्याने आतापर्यंत या स्थानावर खेळून 3 सामन्यात केवळ 30 धावा केल्या. यामुळे कोहली तिसऱ्या स्थानासाठीच योग्य आहे. रायुडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी गेल्या 14 सामन्यात 464 धावा केल्या. कुठल्याही फलंदाजासाठी या आदर्श धावा ठराव्यात. धोनी मागील चार वर्षांत 12 वेळा चौथ्या स्थानी खेळला. त्यात त्याने 448 धावा केल्या. तसेच, अजिंक्‍य रहाणे दहा वेळा या स्थानावर खेळला आणि त्याने 420 धावांचे योगदान दिले.

लोकेश राहुलने 4 सामन्यात 26, केदार जाधवने 4 सामन्यात 18 आणि हार्दिक पांड्याने 5 सामन्यात चौथ्या स्थानावर खेळून विशेष छाप पाडली नाही. त्याने इंदूर येथे केवळ एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2017 मध्ये 78 धावा ठोकल्या होत्या. अशावेळी विश्वचषकाआधी डोकेदुखी ठरलेल्या चौथ्या स्थानी खेळणार कोण हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)