रिकाम्या मैदानांवरील क्रिकेटबाबत बॉर्डर नाराज
मेलबर्न – क्रिकेटचे सामने प्रसंगी मैदाने रिकामी ठेवून खेळविण्याची तयारी टी-20 विश्वकरंडक व आयपीएलबाबत वर्तविण्यात आली होती. त्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व समालोचक ऍलन बॉर्डर यांनी हे म्हणजे गाडी घेतलेली नसताना हेल्मेट घालण्यासारखे आहे, अशा शब्दात ताशेरे ओढले आहेत.
करोनाच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा कशी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर यजमान ऑस्ट्रेलियासह भारतानेही प्रसंगी मैदाने रिकामी करुन सामने खेळण्याची तयारी दर्शविली आहे. क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रीडाविश्व प्रेक्षकांच्या उपस्थितीतच खेळविले गेले पाहिजे. एखाद्या सामन्यात प्रेक्षकांनी गोंधळ घातला तर आपण त्यांना बाहेर काढून सामना खेळवतो हा अपवाद सोडला तर स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक नाही आणि अशा अत्यंत निराशाजनक वातावरणात सामने कसे खेळवू शकतो. एखाद्याकडे दुचाकी गाडीच नाही आणि त्याने हेल्मेट घातलेले कधी पाहिले आहे का, अशा शब्दात ऍलन बॉर्डर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
करोनाच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने सहा महिन्यांचा लॉकडाऊन केला आहे. ही मुदत 30 सप्टेंबरला संपत आहे. मात्र टी-20 विश्वकरंडक स्पर्धा 18 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. परदेशी खेळाडूंना देण्यात येणारे व्हिसादेखील दिले जातील का असा प्रश्न आहे. त्यामुळे एकवेळ स्पर्धा पुढे ढकलण्यात आली तरीही हरकत नाही पण प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळविणे कोणलाही पटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता ऑस्ट्रेलिया मंडळ करोनामुळे आलेल्या संकटावर कशी मात करेल याकडे भारतीय नियामक मंडळाचेही लक्ष लागलेले आहे. जर येत्या दोन महिन्यांमध्ये परिस्थिती बदलली नाही तर ऑलिम्पिकप्रमाणेच विश्वकरंडक स्पर्धा देखील पुढे ढकलावी लागेल. सध्यातरी आयसीसी, बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोणताही निर्णय जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोहली कसा तयार होईल – लायन
टी-20 विश्वकरंडक पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. जर सामने खेळविण्यासाटी मैदानच रिकामे केले तर ते कोहलीला मान्य असेल का, असा खोचक सवाल ऑस्ट्रेलियाचा अव्वल फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने केला आहे. दोन संघात सामना असेल व त्यातील एक संघ भारताचा असेल तर प्रेक्षकांच्या उत्तेजनावर त्याच शैलीत प्रतिसाद देत धडाकेबाज कामगिरी करणारा कोहली रिकाम्या मैदानावर खेळण्यास तयार होइल का, असे लायनने विचारले आहे.