पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धा : टिंगरे सरकार इलेव्हन उपान्त्यफेरीत दाखल

पुणे – शाहू क्रिकेट क्‍लब व भूतान क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पालकमंत्री चषक’ क्रिकेट स्पर्धेत “क’ गटातून अझर गोट्या व “ड’ गटातून टिंगरे सरकार इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित उपान्त्यफेरीत धडक दिली.

सहकारनगरमधील तळजाई येथील सदू शिंदे मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील “क’ गटाच्या उपान्त्यपूर्व सामन्यात अझर गोट्या इलेव्हन संघाने ढोरे इलेव्हन संघावर 26 धावांनी मात केली. अझर इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 79 धावा केल्या. यात सिद्धेश बाठे (31), किसन मरगळे (नाबाद 21) व सागर ली (18) यांनी उपयुक्त फलंदाजी केली.

यावेळी ढोरे इलेव्हनच्या सनी कसबेने एक गडी बाद केला, तर दोन फलंदाज धावबाद झाले. अझर गोट्या संघाकडून मिळालेल्या 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ढोरे इलेव्हन संघाला 4 बाद 53 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून बबन ननावरे (11) व रोहित पाटील (10) यांनाच दुहेरी धावा करता आल्या. अझर गोट्या संघाकडून अझीज शेखने 2 गडी बाद केल.

तर, “ड’ गटाच्या उपान्त्यपूर्व लढतीत टिंगरे सरकार इलेव्हनने कर्णवीर इलेव्हन संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णवीर इलेव्हन संघाला 9 बाद 36 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. त्यांच्याकडून केवळ विशाल मोरेने (15) दुहेरी धावा केल्या. टिंगरे सरकार इलेव्हनकडून नितीन वाळकेने 5 धावांत 4, तर राहुल सातवने 12 धावांत 3 गडी बाद केले. टिंगरे सरकार इलेव्हन संघाने हे माफक लक्ष्य 4.1 षटकांत 1 बाद 38 धावा करून पूर्ण केले. यात पप्पू रामगडे व पप्पू तोडकर यांनी चांगली फलंदाजी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)