एस.बालन संघाचा सलग दुसरा विजय

भाऊ कोकणे आणि फ्रेन्डस इलेव्हन संघांना पराभवाचा धक्‍का

एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – एस.बालन ग्रुप आणि व्हर्चुअल सिम्युटेक संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि पुनित बालन एन्टरटेन्मेंट आणि स्टेडियम क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

नेहरू स्टेडियम मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी अच्युत मराठे याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व्हर्चुअल सिम्युटेक संघाने भाऊ कोकणे क्‍लबचा 3 गडी राखून पराभव केला. भाऊ कोकणे संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी बाद 148 धावा केल्या. यामध्ये धीरज कदम याने 53 धावांची खेळी केली. यासह रोहन घाडगे (39 धावा) आणि विजय कोतवाल (22) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. व्हर्चुअल सिम्युटेक संघाच्या अच्युत मराठे याने 25 धावात 4 गडी बाद करून कोकणे संघाचा डाव मर्यादित ठेवला. व्हर्चुअल सिम्युटेकने हे आव्हान 19.3 षटकांत व 7 गडी गमावून पूर्ण केले. सुजित उबाळे (44 धावा), अतिष कुंभारे (नाबाद 44) आणि मनोज यादव (32 धावा) यांनी जबाबदारीने फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिशय कमी धावसंख्येचा आणि गोलंदाजांनी गाजवलेल्या सामन्यात, दिपक डांगीच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर एस. बालन ग्रुप संघाने फ्रेन्डस्‌ इलेव्हन संघाचा 4 गडी राखून पराभव केला. फ्रेन्डस्‌ इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली पण मोठी धावसंख्या उभी करण्यात त्यांना अपयश आले. कारण एस. बालन संघाच्या दिपक डांगी आणि रोहीत सरवडे यांनी त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. दिपक याने 19 धावात 4 गडी, तर रोहीत याने 8 धावात 3 गडी बाद केले. फ्रेन्डस्‌ इलेव्हनचा डाव 17.1 षटकांत 84 धावांवर संपुष्टात आला. एस. बालन ग्रुपला या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कठीण गेले नाही. त्यांनी 16.2 षटकांत व 6 गडी गमावून आवश्‍यक धावसंख्या पार केली. आकाश सुतार (30) आणि अभिषेक सुपेकर (17) यांनी संघाचा विजय सुकर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)