क्रिकेटविश्‍वाला कोहलीप्रमाणेच धोनी व द्रविडचीही गरज: डेव्हिड रिचर्डसन

एमसीसी कॉलिन कौड्रे वार्षिक व्याख्यानात आयसीसीचे कार्यकारी प्रमुख डेव्हिड रिचर्डसन यांची स्पष्टोक्‍ती

लंडन: क्रिकेटची लोकप्रियता अबाधित ठेवण्यासाठी विराट कोहली किंवा बेन स्टोक्‍स यांसारख्या खेळाडूंची आपल्याला निश्‍चितच गरज आहे. परंतु क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असल्याचे तत्त्व आपल्याला विसरता येणार नाही आणि त्यासाठी महेंद्रसिंग धोनी किंवा राहुल द्रविडसारख्या निष्कलंक चारित्र्य आणि वागणूक असलेल्या खेळाडूंची नितांत आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन आयसीसीचे कार्यकारी प्रमुख डेव्हिड रिचर्डसन यांनी आज केले. एमसीसीच्या कॉलिन कौड्रे स्मृती वार्षिक व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख वक्‍ते म्हणून ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉल टॅम्परिंग, फसवाफसवी, सट्टेबाजी, शेरेबाजी, खोटे अपील करणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी वाढत्या प्रमाणात दिसत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्‍त केली. तसेच गेल्या काही दिवसांत क्रिकेटच्या मैदानावर दिसू लागलेल्या गैरवर्तणुकीच्या घटनांमुळे क्रिकेटचा डीएनए डागाळला असल्याचे सांगतानाच आता खेळाडू व प्रशिक्षकांनीच पुढाकार घेऊन या प्रकारांवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रेक्षकांना आणि सर्वसामान्य क्रिकेटरसिकांच्या मनावर विराट कोहली किंवा बेन स्टोक्‍सच नव्हे तर कॉलिन मिलबर्न्स, फ्लिन्टॉफ, शेन वॉर्न अशा मैदानावर आणि बाहेरही वेगवेगळ्या कारणांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या, तसेच जममानसात “लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा असलेल्या खेळाडूंचा मोठा प्रभाव असतो.

क्रिकेटलाही अशा खेळाडूंची गरज आहेच. परंतु त्याच वेळी आपली निर्दोष वागणूक आणि निष्कलंक प्रतिमा व चारित्र्याने क्रिकेटचा दर्जा खऱ्या अर्थाने उंचावणाऱ्या धोनी किंवा द्रविडसारख्या व्यक्‍तिमत्त्वांची क्रिकेटला खऱ्या अर्थाने आवश्‍यकता असल्याचे रिचर्डसन यांनी सांगितले. क्रिकेटचे मूलतत्त्व सभ्य वागणूक हेच आहे. परंतु मैदानावरील गैरवर्तणुकीचा अतिरेक वाढत असून त्यामुळे क्रिकेटची प्रतिमा डागाळली आहे, असे सांगताना रिचर्डसन म्हणाले की, एखाद्या खेळाडूला वैयक्‍तिकरीत्या लक्ष्य करून त्याच्यावर शेरेबाजी करणे, बाद झालेल्या फलंदाजाला लक्ष्य करून त्याच्यावरही शेरेबाजी करणे, अकारण शारीरिक धक्‍काबुक्‍की करणे किंवा हमरीतुमरीवर येणे, पंचांचा निर्णय अमान्य करून खेळण्यास नकार देणे, बाद असतानाही पंचांना निर्णय मान्य करण्यास नकार देणे किंवा पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून देणारे हावभाव करणे आणि आता तर बॉल टॅम्परिंग करणे… क्रिकेटची ही प्रतिमा आपल्याला जगासमोर ठेवायची नाही हे तुम्ही ध्यानात घेतले पाहिजे. आयसीसीकडे जादूची कांडी नाही क्रिकेट हा अखेर खेळाडूंचाच खेळ असून त्यांनीच या सगळ्याची काळजी घ्यायची आहे, असे सांगताना रिचर्डसन म्हणाले की, आयसीसी या सर्व आव्हानांवर अत्यंत गांभीर्याने उपाययोजना शोधत असली, तरी आमच्याकडे जादूची कांडी नाही.

वैयक्‍तिक शेरेबाजी किंवा एखाद्या खेळाडूला लक्ष्य केल्यास 6 कसोटी सामने किंवा 12 वन डे सामन्यांसाठी बंदीची शिक्षा आम्ही प्रस्तावित केली आहे. परंतु आम्ही काय उपाययोजना करू यापेक्षा खेळाडूंनीच खिलाडूवृत्ती आणि परस्परांबद्दल आदरभाव याचे पालन केल्यास बरेच प्रश्‍न सुटतील. अनेक प्रशिक्षक आपल्या खेळाडूंच्या चुकीच्या वागणुकीचे समर्थन करीत आहेत किंवा त्यांना पाठिंबा देत आहेत. तसेच पंचांच्या निर्णयाविरुद्ध आपल्या खेळाडूंची बाजू घेत आहेत, ही सर्वात चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता खेळाडूंना चांगल्या खेळासाठी प्रशिक्षित करण्याबरोबरच चांगल्या वागणुकीसाठी शिक्षित करण्याची गरज भासू लागली आहे. या बाबतीत यजमान संघावर मोठी जबाबदारी असून प्रत्येक यजमान संघाने पाहुण्या संघाला सन्माननीय पाहुणे असल्यासारखीच वागणूक देणे गरजेचे आहे. मी दक्षिण आफ्रिका संघात असताना पंचांचे निर्णय बिनतक्रार मान्य करण्याची सक्‍त ताकीद प्रशिक्षक माईक प्रॉक्‍टर यांनी आम्हाला दिली होती याची मला आठवण येते.

“बॉल टॅम्परिंग’बद्दल स्पष्ट नियम अनेक खेळाडू माझ्याकडे बॉल टॅम्परिंगच्या नियमांबद्दल चौकशी करीत आहेत, असे सांगून रिचर्डसन म्हणाले की, आम्ही च्युइंग गम खाऊ शकतो का, आम्ही शुगर ड्रिंक घेऊन शकतो काय किंवा सन स्क्रीन लोशन वापरू शकतो का अशा शंका हे खेळाडू मला विचारतात. परंतु बॉल टॅम्परिंगबाबतचे नियम स्पष्ट आहेत. कोणत्याही बाह्य किंवा कृत्रिम पदार्थाचा वापर करून चेंडूचा मूळ आकार किंवा स्थिती बदलू नका. तसे करताना सापडल्यास कडक शिक्षेला सामोरे जा आणि त्यावर तक्रार करू नका. तुम्ही फसवणूक केली आहे, त्यासाठी शिक्षा होणारच हे ध्यानात घ्या इतकेच मला सांगायचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)