क्रेझ मराठी टी-शर्टसची!

टी शर्टला जर कोणी तरुणाईचा युनिव्हर्सल ड्रेसकोड म्हंटलं तर ते किंचितही वावगं ठरणार नाही. ऑकेजन फॉर्मल असो वा इन्फॉर्मल टी शर्ट नेहमीच वेळ मारून नेतो. घरापासून दूर राहणाऱ्या होस्टेलाईट तरुण तरुणींसाठी तर टी शर्टस एखाद्या सेव्हियर प्रमाणे काम करत असतात. वापरायला कम्फर्टेबल, धुवायला सोपे, आणि मळखाऊ अशा एक ना अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे तरुणाई टी शर्टसवर आपला जीव ओवाळून टाकत असते.

सध्या तरुणाईमध्ये प्रिंटेड टी शर्टसची मोठ्या प्रमाणात क्रेझ असून कॉलेज तरुण तरुणींकडून आपला हटके ऍटिट्यूड दाखविण्यासाठी, कपल्सकडून एकमेकांवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी, टी शर्टसवर असलेल्या प्रिंट्‌सचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आपल्या टी शर्टसवर असलेली प्रिंट इतरांपेक्षा वेगळी आणि हटके असावी अशी मागणी वाढल्याने आता टी शर्टसवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट्‌स पाहायला मिळत असून त्यामध्ये ‘मराठी टी शर्टसची’ क्रेझ चांगलीच वाढली आहे.

ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन मार्केट मध्येही तरुणाई अशाच मराठी टी शर्टसचा ऑप्शन निवडत असून कमीत कमी शब्दांमध्ये काहीतरी फनी वाक्‍य प्रिंट करण्याचा फंडा टी शर्टस मेकर वापरत आहेत. वेगवेगळ्या मुव्हीजमधील फिल्मी डायलॉग, कॅची टॅगलाईन्स, सोशल मीडियावरील स्टेट्‌स अशा कोणत्याही लक्ष आकर्षित करून घेणाऱ्या शब्दांना अशा टी शर्टसवर जागा दिली जात आहे. याबरोबरच पुणेरी टी शर्टस, मुंबईकर टी शर्टस असेही टी शर्टस पाहायला मिळत आहेत. याहूनही दोन पाऊले पुढे जात काही ऑनलाईन विक्रेत्यांकडून आपल्या टी शर्टसवर काय प्रिंट असावी, त्याचा फॉन्ट कसा असावा, टी शर्टसवर फोटो असावा काय? फोटो कोणता असावा असे सगळे ऑप्शन्स उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामुळे “पर्सनलाइझ्ड’ टी शर्टसचा ट्रेंडदेखील वाढतो आहे.

– ऋषिकेश जंगम

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)