#कव्हर स्टोरी: उद्योगरागिणीचा प्रेरणादायी प्रवास (भाग-३)

डॉ. जयदेवी पवार 
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आणि आपल्या मेहनतीने जगातील एका प्रचंड मोठ्या कंपनीच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या इंद्रा नूयी या ऑक्‍टोबरमध्ये पेप्सिको कंपनीच्या सीईओपदावरून पायउतार होत आहेत. स्वप्नाचा सातत्याने पाठलाग करण्याची आईने लहानपणी दिलेली शिकवण त्यांनी तंतोतंत अंमलात आणली आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून आपले लक्ष्य गाठले. अमेरिकेतही आपले भारतीयत्व जपणाऱ्या इंद्रा नूयी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्रोत आहेत. 
सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलेल्या मोजक्‍या महिलांपैकी एक आहेत. फोर्ब्जच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांनी सातत्याने आपले नाव कायम ठेवले. गेल्या वर्षी त्यांचा या यादीत 11 वा क्रमांक लागला होता. एकंदर 24 वर्षे त्यांनी पेप्सिकोमध्ये काम केले आणि त्यातील 12 वर्षे कंपनीचे सर्वोच्च पद भूषविले. 2006 मध्ये त्यांनी जेव्हा हे पद स्वीकारले, तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 78 टक्‍क्‍यांची वाढ झाली. त्यांनी कंपनीत आखलेल्या दीर्घकालीन धोरणांचा हा परिणाम मानला जातो. त्यांनी जेव्हा ही धोरणे आखण्यास सुरुवात केली तेव्हा त्या 38 वर्षांच्या होत्या.
जागतिक पातळीवर इंद्रा नूयी यांनी मिळविलेल्या यशाला मोठा मान आहे. त्या जेव्हा अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्या, तेव्हा तेथे शिकायला जाणाऱ्यांची संख्या मोजकीच होती. आज दरवर्षी दहा हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जात आहेत. इंद्रा नूयी यांनी ठेवलेला आदर्श अनेकांना त्यासाठी उद्युक्त करतो आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतल्यास काहीच कठीण नसते, हा धडाही इंद्रा यांनीच भारतीय तरुणांना घालून दिला आहे.
 अर्थात जेव्हा त्या पेप्सिकोच्या सीईओ बनल्या, तेव्हा एखाद्या बड्या कंपनीच्या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय नव्हत्या. नागपूरचे विक्रम पंडित त्यावेळी सिटीबॅंकेचे चेअरमन होते. परंतु महिलांमध्ये हा मान इंद्रा नूयी यांनीच पटकावला. त्यांचे यश आणखी एका कारणासाठी महत्त्वाचे ठरते. त्यांना या पदावर पोहोचण्यापूर्वी अनेक अडथळ्यांमधून जावे लागले होते. परंतु कोणत्याही वळणावर त्यांचा आत्मविश्‍वास डळमळीत झाला नाही आणि स्वप्न पाहण्याची तसेच त्याचा पाठलाग करण्याची ऊर्मी तसूभर कमी झाली नाही. महिलांसाठी नूयी यांचा प्रवास अधिकच प्रेरणादायी आहे.
आपल्याकडे लग्न, संसार केंद्रस्थानी ठेवूनच मुलींच्या आयुष्याचे नियोजन केले जाते. काही मुलींना तर त्यासाठी आपल्या कारकीर्दीवर पाणीही सोडावे लागते. नूयी यांनी काम आणि आयुष्य यातला समतोल उत्तमरीत्या सांभाळला.
व्यक्‍तिगत जीवनात त्यांनी आपले भारतीयत्व सोडले नाही. एवढ्या मोठ्या कंपनीतील सर्वोच्च पद भूषविताना त्यांनी आपल्या आवडीनिवडी जोपासल्या. त्या शुद्ध शाकाहारी असून, आपल्या ऑफिसमध्ये त्यांनी गणेशाची मूर्तीही ठेवली होती.
त्यांनी संगीताची आवडही जोपासली असून, ऑफिसमध्ये काम करताना त्यांना काहीशा उंच आवाजात गाणे गुणगुणताना अऩेकांनी पाहिले आहे. त्यांची बहीण चंद्रिका टंडन याही संगीत क्षेत्रात नावाजलेल्या असून, त्यांना 2001 मध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. आता त्या पेप्सिकोच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होत आहेत. राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण कौटुंबिक जीवनाकडे अधिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोन ऑक्‍टोबरपासून त्या कंपनीपासून दूर जातील. कृतार्थ जीवनाच्या यापुढील टप्प्यासाठी त्यांना शुभेच्छा चिंतूया.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)