#कव्हर स्टोरी: उद्योगरागिणीचा प्रेरणादायी प्रवास (भाग-१)

डॉ. जयदेवी पवार 
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आणि आपल्या मेहनतीने जगातील एका प्रचंड मोठ्या कंपनीच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या इंद्रा नूयी या ऑक्‍टोबरमध्ये पेप्सिको कंपनीच्या सीईओपदावरून पायउतार होत आहेत. स्वप्नाचा सातत्याने पाठलाग करण्याची आईने लहानपणी दिलेली शिकवण त्यांनी तंतोतंत अंमलात आणली आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून आपले लक्ष्य गाठले. अमेरिकेतही आपले भारतीयत्व जपणाऱ्या इंद्रा नूयी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्रोत आहेत. 
पेप्सिको या शीतपेयांच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद(सीईओ) सोडण्याचा निर्णय इंद्रा नूयी यांनी घेतला आहे. मूळ भारतीय असलेल्या नूयी या बारा वर्षे पेप्सिको कंपनीच्या सर्वोच्च अधिकारीपदावर होत्या. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या इंद्रा नूयी यांचा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
लहानपणी प्रत्येकाचे काही ना काही बनण्याचे स्वप्न असते. इंद्रा यांना लहानपणी कुणी त्याविषयी विचारले असता, मला खूप मोठं व्हायचं आहे, एवढेच उत्तर त्या देत असत. त्यांच्या मातोश्री शांता यांनी त्यांना आणि त्यांच्या मोठ्या भगिनी चंद्रिका यांना मुली म्हणून कधी मर्यादित विचार करायला भाग पाडले नाही. उलट, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिले. तुझे स्वप्न काहीही असो, त्याचा पाठलाग सातत्याने कर, असे त्या इंद्रा यांना सांगत असत.
वयाच्या कोणत्याही टप्प्यापर्यंत हा पाठलाग चालला तरी अंतिमतः तुझे स्वप्न तुला मिळेलच, अशी ग्वाहीसुद्धा देत असत. इंद्रा यांच्या बालमनावर आईचे शब्द कोरले गेले होते. 25 ऑक्‍टोबर 1955 रोजी चेन्नईत इंद्रा यांचा जन्म झाला. मद्रास ख्रिश्‍चन कॉलेजमधून इंद्रा यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यानंतर कोलकता येथील आयआयएममध्ये व्यवस्थापनशास्त्राची पदवी संपादन केली आणि अनेक कंपन्यांमधून नोकरी केली.
आपल्याला जर करिअर चांगले घडवायचे असेल, तर आपले अंगभूत गुण लोकांसमोर यायला हवेत, असे या काळात त्यांना सातत्याने वाटत राहिले. लक्ष्यावर केंद्रित होऊन त्या अपार मेहनत घेत राहिल्या. उद्योग क्षेत्रातील सखोल ज्ञान घेण्यासाठी अमेरिकेला जायचा निर्णय त्यांनी घेतला.
येल स्कूल ऑफ मॅनेजमेन्टमध्ये प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती आणि प्रवेशासाठी पुरेसे गुणही त्यांना व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमात मिळाले होते. परंतु अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्यापुरते पैसे नव्हते. त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता थेट तेथे प्रवेश घेतला आणि रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत शिक्षण सुरू ठेवले. दिवसभर अभ्यास करून रात्री त्या नोकरी करीत असत. अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी बोस्टन कन्सल्टन्सीमधून खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात केली. परंतु 1968 मध्ये त्यांच्या मोटारीचा अपघात झाला आणि त्यांना ती नोकरी सोडावी लागली.
हा धक्का पचविल्यानंतरही त्यांची जिद्द कायम राहिली आणि काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी विषयात करिअर घडविण्याचा निर्णय घेतला. एबीबी मोटोरोला सारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी नोकऱ्या केल्या. 1994 मध्ये त्यांना पेप्सिको कंपनीची ऑफर आली. ज्या संधीची इतकी वर्षे त्यांनी वाट पाहिली, ती समोर उभी राहिली होती. मग इंद्रा नूयी यांनी परिश्रमात कधीच कमतरता ठेवली नाही. पेप्सिकोमध्ये प्रचंड मेहनत त्यांनी सुरू केली आणि त्यांना त्याचे फळही मिळाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)