मुंबई – डान्स बार मध्ये पकडलेल्या ४७ आरोपींना जामीन हवा असल्यास अनाथ आश्रमात दान करण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. बदलापूर मधील अनाथाश्रमास प्रत्येकी तीन हजार रुपये दान करण्याची अट कोर्टाने घातली आहे. आरोपींना १ लाख ४१ हजार रुपये पोलीस ठाण्यात जमा करण्यास न्यायालयाने सांगितले. ही रक्कम नंतर अनाथाश्रमात दान करण्यात येणार आहे.
हाजीअली परिसरात असलेल्या ‘इंडियाना रेस्तरॉं अँड बार’ मध्ये पोलिसांनी धाड टाकली होती. त्यावेळी आठ बारबाला आरोपींच्या अत्यंत जवळ नाचत असल्याचे चित्र पोलिसांना पाहायला मिळाले. बारबाला अश्लील हावभाव करत असल्याचे निदर्शनास आले, तर ग्राहक त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. गेल्या वर्षीच ‘इंडियाना रेस्तरॉं अँड बार’ चा परवाना सुरक्षेच्या कारणामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत ४७ जणांना ताब्यात घेतले होते.