साताऱ्यात मतमोजणीची जय्यत तयारी

सातारा – सातारा लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दि. 23 मे 2019 रोजी विधानसभानिहाय मतमोजणी केली जाणार आहे. यासाठीची जय्यत तयारी झाली असून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून सुरुवातीला पोस्टल मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर ईव्हिएम मतांची मोजणी केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. सुरुवातीलाच संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सातारा डीशनल एमआयडीसी येथील महाराष्ट्र फेडरेशच्या गोदामात झाले. निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी मतमोजणी प्रात्यक्षिकाची पहाणी करुन आवश्‍यक त्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी यावेळी दिली. मतमोजणीच्या दिवशी पोस्टल मते सुरुवातीला मोजण्यात येणार आहेत. यानंतर विधानसभानिहाय ईव्हिएम मशिनद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभानिहाय मतमोजणी फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे असेल. वाई-23, कोरेगाव-18, कराड उत्तर-17, कराड-दक्षिण-16, पाटण-20, सातारा-23 अशा फेऱ्या होणार आहेत. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार 5 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशिनमधील मतदानाच्या चिठ्ठयांची मोजणी करण्यात येणार आहे.

मतमोजणी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांस देण्यात येणाऱ्या ओळखपत्रास तसेच मतमोजणी कक्षास विधानसभा संघनिहाय वेगवेगळे रंग ठरवून देण्यात आलेले आहेत ते पुढीलप्रमाणे वाई – पिवळा, कोरेगाव-हिरवा, कराड दक्षिण-निळा, कराड उत्तर-लाल, पाटण-पांढरा, सातारा- ग्रे. मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणीचे साहित्य, माध्यम कक्षातील सुविधा, मोबाईल जमा करुन घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ऑनलाईन निकाल, लाईट व लाऊडस्पिकर, ततझ-ढ स्लिप मोजण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच मतमोजणी संदर्भातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितली. उमेदवारांच्या प्रतिनिधींना ओळखपत्रे देण्याची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी विधानसभा संघनिहाय रंगीत ओळखपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणीच्या परिसरात मोबाईल बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक फेरीचा मतमोजणीचा निकाल वेळोवेळी माध्यम कक्षातून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here