पुणे – मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात 21 उमेदवार होते. या मतदार संघातील मतमोजणी 29 फेऱ्यांध्ये पूर्ण करण्यात आली असून एका फेरीसाठी 20 मिनिटांचा कालावधी लागला. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली.
या मतदार संघातील चिंचवड, पिंपरी, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या सहा मतदार संघातील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 8 वाजता टपाली मोजणी पूर्ण करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी लगेचच सुरू करण्यात आली होती. या सर्वच ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. एका मतमोजणीच्या टेबलसाठी चार कर्मचारी व निरीक्षकाची व्यवस्था करण्यात आली होती. ईव्हीएम स्टॉंगरुम मध्ये ठेवण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने फेरीनिहाय ईव्हीएम त्या त्या विधानसभा मतदार संघात मोजणीसाठी घेऊन जाण्यात येत होत्या. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अधिकारी, कर्मचारी, उमेदवारा प्रतिनिधी या सर्वांनात मतमोजणीच्या ठिकाणी मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली होती.
दुपारी 12.30 पर्यंत मतमोजणीची 14 फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अंतिम फेऱ्यांची मोजणी 5 वाजेपर्यंत सुरुच होती. ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच-पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठ्यांची मतमोजणीही करण्यात आली. यासाठी खूप उशीर लागला.
डेटा टॅब्युलेशन व मॅन्युअल टॅब्युलेशन, सुविधा ऍप कक्ष यांची व्यवस्थाही करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी प्रत्येक मतमोजणीच्या फेरीनंतर उमेदवारांना मिळालेल्या मतांची तपासणी करुनच मते जाहीर केली.