ग्राहकांना प्रतिलिटर 5 रुपयांचीच सवलत

सुधीर मुनगंटीवार : कर कपातीचा फायदा मिळत नसल्याच्या चर्चेला उत्तर

पुणे – राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना या कर कपातीचा पूर्ण फायदा मिळत नसून प्रतिलिटर पेट्रोल 4.37 रुपये कमी झाल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याच्या सवलतीनंतर राज्यात ग्राहकांना प्रतिलिटर 5 रुपयांचीच सवलत मिळेल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

-Ads-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बांबू प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमानंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गिरिश बापट उपस्थित होते. इंधनदरासंदर्भात ते म्हणाले, इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केले असून प्रतिलिटर दीड रुपयांचा केंद्र सरकार तर, एक रुपयाचा बोजा तेल कंपन्या उचलतील, असे केंद्राने स्पष्ट केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून पेट्रोलवरील कर अडीच रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली होती. मात्र ग्राहकांना 5 रुपयांऐवजी 4 रुपये 37 पैसे इतकीच सवलत मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वित्तमंत्र्यांनी खंडण केले आणि ग्राहकांना पेट्रोलवर 5 रुपयांचीच सवलत मिळेल, असेही ते म्हणाले.

राज्यावर दुष्काळ स्थितीबाबत मुनगंटीवार म्हणाले, दुष्काळाचा आढावा घेण्यात येत आहे. याकडे सरकार गंभीरपणे लक्ष देईल. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी बांधवांना याचा सामना करावा लागत आहे. जलसंपदा विभागाचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर आम्ही भर देत आहोत. दुष्काळाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू. राज्याच्या तिजोरीवर कितीही वित्तीय भार वाढत असला तरी आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. तसेच, राज्यातून माळढोक पक्षी नामशेष झाल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. राज्यातील माळढोक पक्षांची निश्‍चित संख्या सांगता येणार नाही. मात्र ते राज्यातून नामशेष झालेले नाहीत, असेही मुनगंटीवार म्हणाले.

काटकसरीने पाण्याचा वापर आवश्‍यक
शहराच्या पाण्यात कोणतीही कपात झाली नसल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री गिरिश बापट म्हणाले, एक-दोन दिवसांत पाऊस होऊन अजून 1 टीएमसी पाणी वाढेल अशी आशा आहे. मुंढवा जॅकवेलमधून शेतीला अजून पुरेसे पाणी सोडले पाहिजे. कालव्यातील पाझर खूप आहे, त्यामुळे बंद पाइपलाइनव्दारे पाणी वाचविता आले तर आणखी चांगले होईल. दोन्ही वेळ पुणेकरांना पाणी मिळेल. पुण्याला 892 एमएलडी पाणी मंजूर असताना आपण 1392 एमएलडी पाणी सोडत आहोत. काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्‍यक असून 15 जुलै 2019 पर्यंत आपल्याला हे पाणी पुरवायचे आहे. पाण्यावरून कोणीही राजकारण करू नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)