पत्रसंवाद: प्रियांकास्त्राचा कॉंग्रेसला निश्‍चितपणे फायदा!

धनाजी का. चन्ने, पुणे

उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे, पण केंद्रातील भाजप सरकारच्या कार्यप्रणालीवर मतदार नाराज असून, 2014 च्या तुलनेत मोदींची लाट ओसरत असल्याचे निदर्शनास येते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी व समाजवादी पक्षांनी आघाडी केली असून, त्यात कॉंग्रेसला बाहेर ठेवले आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. भाजपचा पराभव करावयाचा असेल तर कॉंग्रेससह आघाडीची नितांत गरज आहे. पण तसे घडल्याचे दिसत नाही त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने प्रियांका गांधींसारख्या तरुण नेतृत्वाला संधी देऊन पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्‍ती केल्याने व त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाने कॉंग्रेस पक्षाला उभारी तर येईलच त्याचबरोबर युवकांमध्ये नवचैतन्य येईल. त्यांना पक्षाच्या स्टार प्रचारक केले असून त्या उच्चविद्याविभूषित आहेत तसेच त्यांना निवडणूक रणनीतीचा चांगला अनुभव आहे. त्यांची लोकांशी सहज संवाद साधण्याची हातोटी, ओघवती भाषाशैली, लोकांना भुरळ घालण्याची पद्धत, इंदिरा गांधीसारखी प्रतिमा व प्रचार मोहिमेचा दांडगा अनुभव असल्याने त्याचा कॉंग्रेसला निश्‍चितच फायदा होईल. पूर्व उत्तर प्रदेशात लोकसभेचे 40 मतदारसंघ येतात, पंतप्रधान मोदींचा वाराणसी मतदारसंघही त्यातच येतो.

गांधी-नेहरू घराण्याचा हा पक्ष असल्याचा कांगावा खुद्द पंतप्रधान मोदीकडून तसेच भाजपाकडून वारंवार होताना दिसतो. घराणेशाही सर्वच ठिकाणी पाहावयास मिळते. पण या घराण्याकडून आजपर्यंत देशाची फार मोठी सेवा घडलेली आहे. देशासाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना आपले जीव गमवावे लागलेले आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे देशातील मतदार घराणेशाही असली तरी अद्यापपर्यंत त्यांना विसरलेली नाहीत.

नेहरू-गांधीपासून आजपर्यंत अनेक पिढ्या झाल्या तरी मतदारांच्या ते स्मरणात आहेत. घराण्यातील प्रत्येकाचे देशाबद्दलचे प्रेम, त्यांनी केलेले कार्य तसेच दिलेले बलिदान हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे घराण्यातील वारस असलेल्या प्रियांका गांधीचा राजकारणातील प्रवेश कॉंग्रेससाठी निश्‍चितच फलदायी ठरणार आहे. महाआघाडीने देशात एकत्रित लढा दिल्यास केंद्रातील सत्ता मिळविणे अवघड नाही. याचा महाआघाडीतील पक्षांनी विचार करावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)