अबाऊट टर्न : कॉपी

-हिमांशू

कॉपी कुणी, कुणाची, कधी आणि कशासाठी करावी, यासाठी काही नियमावली नाही. कॉपीराइट्‌स कायद्यानं सुरक्षित असले, तरी काढणारे त्यातूनही मार्ग काढतातच. गंमत म्हणून एखाद्याची नक्कल करणं किंवा नकलाकार म्हणून करिअर घडवणं वेगळं. ती राजरोसपणे, सांगून केलेली नक्कल असते. परंतु काही (न)कलाकार हुबेहूब कॉपी करण्यात प्रचंड बुद्धी खर्ची घालतात आणि त्यातून काही प्राप्ती होतेय का, हे पाहतात. म्हणूनच आपल्याकडे डुप्लिकेट वस्तूंची रेलचेल दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉपी करण्यामागं सामान्यतः दोन कारणं असतात. जेव्हा स्वतःचं असं काही स्वतंत्र सूचत नाही, तेव्हा कॉपी केली जाते किंवा स्वतःची निर्मिती विकली जाईल की नाही याबाबत संभ्रम असतो, तेव्हाही कॉपी केली जाते. याच मानसिकतेतून हॉलीवूडमधले चित्रपट बॉलीवूडमध्ये जसेच्या तसे येतात आणि प्रसिद्ध गाण्यांच्या चालीही ऍडॉप्शन या नावाखाली कॉपी केल्या जातात. साहित्याच्या क्षेत्रातही आता वाड्‌.मयचौर्याच्या सुरस कथा ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे, असंख्य कॉपी बहाद्दर या मार्गानं खूप पैसाही मिळवतात. अभ्यासू किंवा वेगळं काही तरी करू पाहणारी माणसं मात्र खितपत पडतात. जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांमध्ये असंच घडत असल्याचं दिसत असताना विद्यार्थी तरी अभ्यासाचा मार्ग का स्वीकारतील, हा प्रश्‍नच आहे. त्यांनाही कॉपीचाच मार्ग जवळचा वाटत असावा.

कॉपी कशाची आणि कशा प्रकारे केली जाते, याची दोन ताजी उदाहरणं अवाक्‌ करणारी आहेत. नांदेडमध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचं रेटकार्ड तयार केल्याचं उघड झालंय. एका प्रश्‍नाचं उत्तर शंभर रुपयांना विकलं जातं तर उत्तर थेट परीक्षार्थीपर्यंत पोहोचवायचं असेल, तर एका उत्तराला हजार रुपये पडतात म्हणे. प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर शंभर रुपयात मिळेल, असंही नाही. प्रश्‍न जितका अवघड असेल, तितके अधिक पैसे मोजावे लागतात. ज्या अर्थी संबंधित कॉपी व्यावसायिक परीक्षार्थीपर्यंत उत्तर पोहोचवण्याचं कंत्राट घेतात, त्याअर्थी ते खूपच पोहोचलेले असले पाहिजेत.

राजरोस, उघडपणे चाललेला कॉपीचा हा बाजार पाहून कपाळावर हात मारून घेईपर्यंत, नागपूरचं कॉपी प्रकरण समोर आलं. तिथं एका पठ्ठ्यानं चक्क क्राइम ब्रॅंचचीच कॉपी केली. म्हणजे क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं नाव देऊन क्राइम ब्रॅंचचंच डुप्लिकेट ऑफिस थाटलं. तेही भाड्याच्या घरात. गाडी मात्र या पठ्ठ्याचीस्वतःची असावी. त्यावर त्यानं क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा डायरेक्‍टर असल्याचा बोर्ड लावलेला. क्राइम ब्रॅंचसारखाच छोटा झेंडा लावलेल्या या गाडीत बसून शहरातून फेरफटका मारताना तो कधीच डगमगला नाही. पण पोलिसांना त्याचे कारनामे समजताच छापा पडला आणि त्याला पळता भुई थोडी झाली. कॉपीचा हा विचित्र नमुना पाहून पोलिसही क्षणभर बुचकळ्यात पडले असतील.

कॉपीचे असे वेगवेगळे नमुने आणि लहानथोरांना असलेलं कॉपीचं आकर्षण पाहून कधीकधी वाटतं, कॉपी करणं हा एक आजारच असावा. कधी वाटतं त्यामागे पक्‍क गणित असावं. पण बऱ्याच वेळा असंही वाटतं की, नव्या, सृजनात्मक आणि कष्टानं केलेल्या गोष्टी समाजाला रुचत नाहीत म्हणून माणसं कॉपीच्या मागं लागत असावीत. अभिनेत्यांप्रमाणं नेतेही एकमेकांच्या संवादफेकीची कॉपी करतात. शिवाय असे भलभलते दावे करतात की, समोर बसलेल्यांना वाटतं, आपण उगीच अभ्यास केला. त्यापेक्षा कॉपी केली असती तर…?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)